गावतळे : गणरायाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण उत्सुक असताना दापोली तालुक्यातील गावतळे परिसरातील ३२ गावांमधील वीजप्रवाह सतत खंडित होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून महावितरणविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून गेले दोन महिने सतत वीजप्रवाह खंडित होत होता. त्यावर मार्ग काढण्यात महावितरणला यश आले. त्यामुळे गेले काही दिवस वीजपुरवठा पूर्ववत झाला होता; परंतु गेले दोन दिवस पुन्हा दिवसातून दहावेळा वीजप्रवाह खंडित होत आहे. सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे ऐन उत्सवाच्या तोंडावर सुरू झालेल्या या समस्येने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
गेले दोन दिवस गावतळे बाजारपेठेसह परिसरातील फणसू व इतर लहान बाजारपेठेतील आईस्क्रिम व्यापारी तसेच विजेवर अवलंबून असणाऱ्या उद्योगांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकाराबाबत वाकवली येथील महावितरण उपअभियंता सागवेकर यांच्याशी संपर्क साधला असता वीजपुरवठा पूर्ववत केला होता; मात्र त्यात पुन्हा बिघाड झाला आहे. कर्मचारी काम करत आहेत, असे सांगितले. त्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत झाला; परंतु तासाभरातच पुन्हा वीजपुरवठा खंडित झाला. हा खेळ साधारण २ दिवस चालू आहे.
महावितरणने वेळीच लक्ष द्यावे
महावितरणला मुख्य बिघाड सापडला नसल्यामुळे सतत वीजप्रवाह खंडित होत आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालून ग्राहकांना दिलासा द्यावा व वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करावा जेणेकरून गणरायाच्या आगमनावेळी सतत वीजप्रवाह खंडित होणार नाही, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 AM 21/Aug/2025














