रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात महावितरणच्या वीज ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणावर बिलाची थकबाकी आहे. एकूण १,२२,०७७ग्राहकांकडील ३५.२९ कोटी रुपयांची वीज बिले थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. ही थकबाकी वसूल करण्याचे मोठे आव्हान महावितरणसमोर आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी रत्नागिरी विभागात आहे. या विभागात ५६,५४८ ग्राहकांकडे १६.४८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्या खालोखाल खेड विभागात ३४,८६१ ग्राहकांकडे १०.५८ कोटी आणि चिपळूण विभागात ३०,६६८ ग्राहकांकडे ८.२३ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
तालुकानिहाय आकडेवारी पाहिल्यास रत्नागिरी (शहरी) विभागात सर्वाधिक १०,८३१ ग्राहकांकडे ५.७० कोटी रुपयांची थकबाकी आहे. यानंतर चिपळूण (ग्रामीण) विभागात ग्राहकांकडे २.४७ कोटी आणि रत्नागिरी (ग्रामीण) मध्ये ८८९१ ग्राहकांकडे ३.१९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या आकडेवारीवरून ९०८० हे स्पष्ट होते की, शहरी व ग्रामीण दोन्ही भागांतील ग्राहकांकडे थकबाकी आहे.
जिल्ह्यात १ लाख ३ हजार ६८२ घरगुती ग्राहकांकडे १३ कोटी ८३ लाख, ११ हजार ३७ व्यावसायिक ग्राहकांकडे ४ कोटी ९६ लाख तर ९२२ औद्योगिक ग्राहकांकडे १.६७लाखांची थकबाकी आहे. पथदीपांचे ९ कोटी ५६ लाख, जलव्यवस्थापनाचे ४ कोटी २४ लाख, यासह शासकीय कार्यालयांचे ९४ लाख रुपये बिल थकीत आहे.
महावितरण आर्थिक संकटात
थकबाकी वाढल्याने महावितरण आर्थिक संकटात सापडले आहे. त्यामुळे ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणकडून कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता आहे. वीजपुरवठा खंडित करणे, थकबाकीदारांवर कायदेशीर कारवाई करणे असे उपाय योजले जाऊ शकतात. वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 23/Aug/2025














