चिपळूण : चिपळुणात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने चलतचित्र देखाव्यांची परंपरा यंदाही कायम राखण्यात आली आहे. पौराणिक देखाव्यांबरोबरच सामाजिक देखावे देखील गणेशभक्तांना महत्त्वाचे संदेश देत आहेत. शहरातील महर्षी अण्णासाहेब कर्वे भाजी मंडई, श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कोकणचा राजा आणि चिपळूण नगर परिषदेने असे देखावे साकारले आहेत. हे देखावे पाहण्यासाठी सर्व समाजातील लोक व गणेशभक्त गर्दी करीत आहेत.
भाजी मंडईचा रावण वध देखावा
चिपळूणमध्ये दरवर्षी गणेशोत्सवात पौराणिक, सामाजिक व सांस्कृतीक देखावे साकारण्यात येत असतात. यामध्ये महर्षी अण्णासाहेब कर्वे भाजी मंडई मंडळाचा महत्त्वाचा सहभाग असतो. यावर्षी या मंडळाने पौराणिक देखावा साकारला आहे. रावण वध हा प्रसंग देखाव्यातून साकारला असून प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि वानरसेना रावणाचा कसा वध करतात हे देखाव्यातून दाखविण्यात आले आहे. दहा तोंडे असलेला भलामोठा रावण या ठिकाणी साकारण्यात आला असून हा देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.
हिरण्यकश्यपू वध देखावा
शहरातील माधव सभागृह येथे श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यावर्षी पौराणिक देखावा करण्यात आली आहे. भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपू यांची कथा चलचित्राद्वारे दाखविण्यात येत आहे. ‘नारायण, नारायण असा जप करू नकोस’ असे भक्त प्रल्हादला सांगणाऱ्या हिरण्यकश्यपूचा वध या देखाव्यातून साकारला असून या ठिकाणीही देखावा पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
स्त्री-भ्रूण हत्या देखावा
शहरातील बहादूरशेख चौक येथील कोकणचा राजा गणेशोत्सव मंडळातर्फे यावर्षी सामाजिक संदेश देणारा देखावा साकारला आहे. स्त्री-भ्रूण हत्येविरोधात हा देखावा संदेश देत असून एका विवाहितेला मुलगा व्हावा यासाठी तिची गर्भलिंग निदान चाचणी सासरच्यांकडून जबरदस्तीने केली जाते. यानंतर मुलगी असल्याचे लक्षात येताच तिची स्त्री-भ्रूण हत्या होणार होती; मात्र हा प्रकार पोलिसांच्या मदतीने हाणून पाडण्यात आला, असा प्रसंग या चलचित्रातून दाखविला आहे. स्त्री-भ्रूण हत्या करणे कायद्याने गुन्हा आहे, हे दाखविले आहे. एक सामाजिक संदेश देणारा म्हणून हा देखावा ठरला आहे. तसेच चिपळूण नगर परिषदेने स्वच्छतेचा संदेश देणारा देखावा केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 04/Sep/2025












