Ratnagiri ST Bus : एसटीत 150 हून अधिक प्रवाशांना कोंबून प्रवास! प्रवाशांचे हाल; जिल्हांतर्गत एसटीचे वेळापत्रक बिघडलेले..

रत्नागिरी : गणेशोत्सवात नंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाल्यामुळे रत्नागिरी विभागाच्या एसटी बसेस मुंबईला रवाना झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हांतर्गत एसटी बसेसचे वेळापत्रक पुन्हा बिघडले आहे. गाड्या वेळेवर येत नाहीत. आलीच तर एकाच एसटीमध्ये तब्बल 140 ते 150 प्रवासी कोंबत आहेत. क्षमतेपक्षा जास्त प्रवासी एसटीमध्ये बसवत आहेत. एसटीच वेळेवर नसल्यामुळे नाईलाजस्तव भरलेल्या एसटीत प्रवाशांना चढावे लागत आहे. तसेच गर्दी, दारात उभे राहून प्रवास करावा लागत आहे.

विशेष करून रत्नागिरी-लांजा, रत्नागिरी-राजापूर, रत्नागिरी-देवरूख यासह लांजा, राजापूर, कणवली बसेसमध्ये ही गुरूवारी तुफान गर्दी होती त्यामुळे नाईलाजास्तव प्रवाशांना उभे राहून रत्नागिरी गाठावी लागली. त्यामुळे चाकरमान्यांसह नोकरदार, व्यापारी, सामान्य प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून चाकरमान्यांना आणण्यासाठी तसेच रत्नागिरी विभागातून मुंबईला सोडण्यासाठी एसटी विभागाने जादा बसेसचे नियोजन केले होते. त्यामुळे सर्वच गाड्या मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या.मात्र यासणाच्या काळात रत्नागिरी विभागाच्या वतीने जिल्हाअंतर्गत प्रवास तसेच जिल्हाबाहेरील बाहेर जाणार्‍या एसटी बसेसचे अचूक नियोजन व एसटी बसेस कोटा राखीव ठेवणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. चाकरमान्यांना मुंबईतून रत्न्ागिरी आणण्यासाठी रत्नागिरी विभागच्या 200 एसटी बसेस मुंबईला गेल्यामुळे जिल्हाअंतर्गत प्रवास करणार्‍या प्रवाशांचे हाल झाले. कोल्हापूर, विजापूरसह जिल्हाअंतर्गत कित्येक बसेस रद्द झाल्या. गाड्याच येत नसल्यामुळे काहींना जास्तीचे पैसे देवून रिक्षा, वडापचा आधार घेवून घर गाठावे लागले. आता तशीच परिस्थिती परतीच्या प्रवासाची झाली असून परतीसाठी रत्नागिरी विभागातून 2,500 एसटी बसेसचे नियोजन केले असून, गाड्या मुंबईला रवाना झाल्या आहेत. त्यामुळे 2 सप्टेंबरपासून एसटीचे वेळापत्रक बिघडले आहे.

रत्नागिरी आगारातून रत्नागिरी-राजापूर, रत्न्ाागिरी-लांजा, रत्नागिरी-देवरूख या गाड्या वेळेत आल्या नाहीत. त्यामुळे एकाच एसटीवर लोड आल्यामुळे तब्बल 150 हून अधिक प्रवाशांना प्रवास करावा लागला. त्यामुळे एसटी विभागातील विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी एसटी बसेसच्या वेळापत्रकाचे नियोजन करणे अपेक्षित होते. मात्र तसे न झाल्याने विनाकारण चाकरमान्यासह दररोजचा प्रवास करणार्‍या नोकरदार, व्यापारी, सर्वसामान्य प्रवाशांना याचा मोठा फटका बसला आहे.

सण, उत्सव असले तरी जिल्हांतर्गत प्रवास करणार्‍या नोकरदार, व्यापार्‍यांचा विचार एसटी विभागाने करणे अपेक्षित आहे. एसटीसाठी तासन्तास वाट पहावी लागते, एसटी आलीच तर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यामुळे उभे राहून रत्नागिरी गाठावी लागत आहे. यावर एसटी विभागाने योग्य ती दक्षता घेवून गाड्या वेळेत व जादा गाड्या सोडणे गरजेचे आहे.- अरुण माने, प्रवासी

परतीच्या प्रवासासाठी एसटी बसेस मुंबईला रवाना झाल्या आहेत. त्यामुळे काहीप्रमाणात एसटी बसेसची संख्या कमी झाली आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी बसेसचे नियोजन केले आहे- प्रज्ञेश बोरसे,विभाग नियंत्रक, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:05 PM 06-Sep-2025