देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील ओझरे खुर्द येथे चिरेखाणीत बुडून तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शनिवारी सकाळी स्थानिक ग्रामस्थांना संतोष विठोबा जागुष्टे (४२) पाण्यात तरंगताना दिसून आला.
जागुष्टे हा ३ सप्टेंबर रोजी सकाळी कामाला जातो असे सांगून घरातून निघून गेला. सायंकाळी उशिरापर्यंत तो घरी न आल्याने व फोनही बंद लागत असल्याने घरच्या मंडळींनी सर्वत्र शोधाशोध व चौकशी केली.
शोध मोहीम सुरू असताना येथीलच चिरेखाणीमध्ये शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एक मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. या घटनेची खबर देवरुख पोलिसांना देण्यात आली. देवरुख येथील पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत जाधव व संदीप जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी व पंचनामा केला.
यावेळी हा मृतदेह जागुष्टे याचा असल्याचे स्पष्ट झाले. पंचनामाप्रसंगी स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. संतोष यांचे वडील विठोबा जागुष्टे यांनी फिर्याद दिली आहे. संतोष व पत्नी यांचे काही कारणावरून पटत नव्हते. न्यायालयीन बाब सुरू असल्याचे यावेळी नमूद केले आहे.
मृत संतोष यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करून रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. यानंतर संतोष याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संतोष याच्या पश्चात आई, वडील, भाऊ व मुलगा असा परिवार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 08/Sep/2025














