संगमेश्वर तालुक्यातील शेतकरी, व्यापारी आणि राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली आमदार शेखर निकम यांची भेट; अधिकाऱ्यांना दिल्या तात्काळ सूचना
Amba Ghat Traffic Update: रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील आंबा घाटातून गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून लागू करण्यात आलेली अवजड वाहतूक बंदी हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात यावी, या मागणीसाठी रविवारी शेतकरी, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (AP) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार शेखर निकम यांची देवरूख येथे भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले.
Amba Ghat Traffic Update: वाहतूक बंदीमुळे शेतकरी अन् व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका
आंबा घाटातील अवजड वाहतुकीवर प्रशासनाने लादलेल्या बंदीमुळे स्थानिक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहतूक बंदीमुळे मालाची ने-आण करणे कठीण झाले असून त्याचा थेट आर्थिक फटका बसत असल्याची कैफियत उपस्थितांनी आमदार शेखर निकम यांच्यासमोर मांडली.
आमदार शेखर निकम यांचे अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश
शेतकरी, व्यापारी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर आमदार शेखर निकम यांनी तात्काळ संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. आंबा घाट मार्गाची पाहणी करून लवकरात लवकर अवजड वाहतूक सुरू करण्याबाबत आवश्यक ती कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीस लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या भेटीदरम्यान हातीव पंचायत समिती सदस्य मंगेश बांडागळे, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा मानसी करंबेळे, संतोष पाल्ये, महेंद्र गुरव, राजू मांडवकर, शशांक शिंदे, संकेत खामकर यांच्यासह अनेक शेतकरी, व्यापारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. आमदारांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर उपस्थितांनी आमदार शेखर निकम यांचे आभार मानले.














