UPSC | केंद्रीय लोकसेवा आयोगाचा महत्त्वाचा निर्णय! यूपीएससीसाठी प्रमाणपत्र डिजिलॉकरद्वारे स्वीकारणार

नवी दिल्ली : पूजा खेडकर प्रकरणानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. परीक्षेतील चीटिंग आणि बनावट प्रमाणपत्रासारखे गैरप्रकार रोखण्यासाठी उमेदवारांची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे स्वीकारण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे. डिजिलॉकर हे प्रमाणपत्र डिजिटल पद्धतीने साठवण्यासाठी आणि पडताळणी करण्यासाठीचा केंद्र सरकारचा क्लाऊड प्लॅटफॉर्म असल्याची माहिती केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष अजय कुमार यांनी बुधवारी व्हर्चुअल टाऊन हॉल कार्यक्रमात दिली.

अजय कुमार म्हणाले की, शासकीय नोकरीसाठी होणाऱ्या कोणत्याही परीक्षेत चीटिंग करणे किंवा बनावट प्रमाणपत्रांचा वापर करणे अस्वीकारार्ह आहे. अशा कृतींमुळे उमेदवारांच्या करिअरवर दीर्घकालीन दुष्परिणाम होतात. त्यामुळे अशा मार्गाचा अवलंब केला, तर कठोर कारवाई केली जाईल, ज्यामध्ये किमान तीन वर्षे कोणत्याही परीक्षेत बसण्यास बंदी घालण्याची तरतूद आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:19 PM 03/Oct/2025