रत्नागिरीच्या राजकारणात खळबळ! विधानसभा निवडणुकीत २३ हजार मतदार बोगस; बाळा मानेंचा थेट आरोप

रत्नागिरी, दि. ३ ऑक्टोबर : आगामी जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारा एक गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार बाळ माने यांनी केला आहे. आज रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना, मागील विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीत तब्बल २३ हजार मतदार बोगस असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. या बोगस मतदारांच्या जोरावर निवडणूक प्रक्रियेत हेराफेरी झाल्याचा संशय व्यक्त करत, ही नावे तात्काळ वगळण्याची मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

राहुल गांधींच्या ‘वोट चोरी’च्या मुद्द्याचा दिला दाखला

पत्रकार परिषदेची सुरुवात करताना बाळ माने यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘वोट चोरी’च्या वक्तव्याचा संदर्भ दिला. माने म्हणाले, “राहुलजी गांधी यांनी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात मत चोरीचा मुद्दा मांडला होता, ज्यामुळे निवडणूक आयोगाच्या पायाखालची वाळू सरकली होती. आज मी रत्नागिरी विधानसभेतील मतदार यादीतील तोच गंभीर प्रकार आपल्यासमोर मांडत आहे. माझ्याकडे पुरावे असून त्याचा पेन ड्राईव्हसुद्धा मी प्रशासनाला देणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत सुमारे २३ हजार मतदार बोगस होते, ज्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते.”

या बोगस मतदारांमध्ये दुबार नावे, ग्रामपंचायतीच्या पत्त्यावर असलेली संशयास्पद नावे अशा प्रकारांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

Hotel waiter

तत्कालीन अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही, पक्षातूनही झाली बेईमानी

निवडणुकीपूर्वीच आपण या बोगस मतदारांची यादी तत्कालीन अधिकाऱ्यांना दिली होती, असेही माने यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “मी माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने ही यादी निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली होती. त्यावेळी, या मतदारांची यादी मतदान केंद्रांवर लावून त्यांना मतदान करण्यापासून रोखले जाईल, असे आश्वासन मला देण्यात आले. परंतु, माझ्या मते ते पूर्णतः खोटे होते.”

यावेळी आपल्याच पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी बेईमानी केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. माने म्हणाले, “निवडणुकीच्या धावपळीत आणि आमच्याच काही तत्कालीन जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख अशा पदाधिकाऱ्यांच्या बेईमानीमुळे प्रत्येक मतदान केंद्रावर आमचे बूथ लेव्हल एजंट (BLA) उपस्थित राहू शकले नाहीत. याचाच गैरफायदा घेऊन या २३ हजार नावांपैकी अनेक नावांवर बोगस मतदान झाले,” असा थेट संशय त्यांनी व्यक्त केला.

आगामी निवडणुकांपूर्वी मतदार यादी शुद्ध करा

येत्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी ६ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बाळ माने यांनी प्रशासनाला धोक्याचा इशारा दिला आहे.

“मी निवडणूक आयोगाला विनंती करतो की, मी दिलेल्या पुराव्यांची तातडीने दखल घेऊन ही बोगस नावे यादीतून वगळण्यात यावीत. गेल्या वेळी हा आकडा २३ हजार होता, आता तो ३३ हजार झाला नसेल कशावरून? ही संपूर्ण मतदार यादी सदोष आहे. जर ही नावे न वगळता निवडणुका घेतल्या गेल्या, तर तो लोकशाहीचा अपमान असेल आणि ती ‘वोट चोरी’च ठरेल,” असे खडे बोल त्यांनी सुनावले.

बाळ माने यांच्या या गंभीर आरोपामुळे रत्नागिरी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, आता निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.