खेड-दापोली राज्यमार्गाचे काम संथ गतीने…

खेड : खेड-दापोली राज्यमार्ग क्रमांक १६२ च्या सुधारणा कामाला ऑगस्ट २०२४ मध्ये औपचारिक सुरुवात झाली. तब्बल ९० कोटी रुपयांचा ठेका एस. एम. सी. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला मिळाला असला तरी, प्रत्यक्षात कामाच्या गतीबाबत गंभीर तक्रारी आहेत. दोन वर्षांच्या मुदतीत हे काम पूर्ण करायचे असून पावसाळ्याचा कालावधी गृहीत धरून नियोजन करणे आवश्यक होते. मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याच्या अनेक भागांत केवळ गटार खोदण्यापुरते काम सुरू आहे.

मुंबई-गोवा महामार्गापासून भरणे नाका ते अन्नाचा पऱ्या या सुमारे ८०० मीटरच्या भागात चौपदरीकरणाचे काम व्हायचे आहे. त्यापुढे दापोलीपर्यंत दुपदरीकरण अपेक्षित आहे. पण नागरिकांचा प्रश्न असा आहे की खेड शहरात रस्ता नेमका किती रुंद होणार? काहींना संशय आहे की राजकीय वरदहस्ताने काहींच्या मालमत्ता वाचवून रुंदीकरणाचा फार्स केला जाणार का? हा संभ्रम दूर करण्यास
सार्वजनिक बांधकाम विभाग अपयशी ठरला आहे.

दरम्यान, दापोलीतील वाकवली येथे ६०० मीटर रस्ता सिमेंट पासून बांधण्यात आला असला तरी त्याचा दर्जा समाधानकारक नाही. अनेक ठिकाणी मोऱ्या बांधताना निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर झाल्याची चर्चा आहे. नागरिक म्हणतात, ९० कोटी खर्च करून असा ढिसाळ दर्जा ठेवायचा असेल, तर सुधारणा कामाचा उद्देशच अपूर्ण राहील.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 AM 04/Oct/2025