चिपळूण : महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी वसुंधरा अभियान ६.०’ अंतर्गत चिपळूण नगरापालिकेमार्फत पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी (ता. १) ‘सायकल दिवसानिमित्त शहरात सायकलफेरी काढण्यात आली. मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.
‘वायू’ कृतिबिंदू अंतर्गत नागरिकांना सायकलचा वापर करण्यास प्रवृत्त करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या दिवशी सर्व नागरिक, अधिकारी व कर्मचारी यांनी खासगी वाहनांचा वापर टाळून सायकल किंवा पायी कार्यालयात हजेरी लावली. या उपक्रमाची सुरवात काल सकाळी ८ वाजता करण्यात आली. ‘स्ट्रावा’ या मोबाईल अॅपद्वारे सर्वांना आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व माहिती देण्याचे काम अभियान समन्वयक सूरज सकपाळ यांनी केले. या उपक्रमात नियमितपणे शाळेत सायकलने येणाऱ्या सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मीडियम स्कूलच्या १०वी अचा विद्यार्थी प्रेम चोरगे याला मुख्याधिकारी भोसले यांच्या हस्ते ‘माझी वसुंधरा मित्र’ प्रमाणपत्र आणि फुलाचे रोपटे देऊन गौरवण्यात आले. हा उपक्रम मुख्याधिकारी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यालय अधीक्षक रोहित खाडे, उद्यान विभागप्रमुख व माझी वसुंधरा अभियान नोडल अधिकारी प्रसाद साडविलकर तसेच इतर नगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने करण्यात आली.
अशी काढली फेरी
सर्व सायकलस्वारांनी चिपळूण पालिका कार्यालय येथून सायकलफेरीला सुरुवात केली. ही फेरी बाजारपेठ रोड-गांधी चौक-नाथपै चौक-नवीन मटणमार्केट- खेडेकर संकुलमार्गे परत कार्यालयात सांगता झाली. त्यामध्ये अनेक नागरिक, विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी पायी चालत सहभागी झाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 PM 04/Oct/2025














