Sangmeshwar: संगमेश्वर स्थानकात अवतरले महात्मा गांधी!

संगमेश्वर : महात्मा गांधी चक्क संगमेश्वर रोड रेल्वेस्थानकात अचानक अवतरल्याने स्थानकावरील उपस्थित रेल्वे कर्मचारी, प्रवासी यांची उत्सुकता चाळवली गेली. हे कसले आंदोलन तर नाही ना, अशी कुजबूज लोकांमध्ये सुरू झाली आणि सर्वांच्या नजरा या गांधीजींचे प्रतीकात्मक देहबोली असलेल्या किशोरवयातील मुलाकडे रोखल्या.

महात्मा गांधी यांच्या वेशभूषेत असलेल्या या मुलाने स्थानकात येताच थेट फलाट गाठले आणि रत्नागिरीकडे जाणाऱ्या रेल्वेगाडीच्या प्रतिक्षेत तो उभा राहिला. काही वेळातच रत्नागिरीहून मडगांवकडे जाणारी गाडी संगमेश्वर रोड स्थानकात आली आणि आपणास आता पुढचा प्रवास करता येईल, या अपेक्षेने अन्य प्रवाशांसोबत बापू पुढे सरसावले; परंतु गाडीचा वेग काही कमी होताना दिसला नाही. अशातच बापूंनी गाडीला हात करून थांबण्याची विनंतीसुद्धा केली; परंतु गाडी सुस्साट वेगाने न थांबता निघून गेली. निराश होत बापूंनी आपला मोर्चा तडक स्थानकावरील स्टेशनमास्तर यांच्या कार्यालयाकडे वळवला. त्यावेळी लोकांना गांधीजींनी केलेल्या दांडी यात्रेची आठवण झाली.

बापूंनी स्टेशनमास्तर यांच्याकडे तक्रारवही मागत संगमेश्वर स्थानकात अतिरिक्त गाड्या थांबवाव्यात व प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी तक्रार दाखल केली. संगमेश्वर रेल्वेस्टेशन येथे बापूंना गाठून पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, गेल्या अडीच वर्षांपासून भिजत असलेला मडगाव, जामनगर, पोरबंदर या एक्स्प्रेसना संगमेश्वर रेल्वेस्थानकात थांबा देण्याच्या निर्णयावर अद्याप कोणत्याही स्वरूपाचा निर्णय नाही. लोकप्रतिनिधी, समाजसेवी संघटना, रेल्वे प्रवाशी संघटना यांच्या पत्रांना केराची टोपली दाखवली आहे. हा अन्याय इथल्या सर्वसामान्य जनतेवर होतो आहे. या अन्यायाविरूद्ध हे अहिंसक, शांततेच्या मार्गाने आंदोलन मी संगमेश्वर तालुक्यातील जनतेचा प्रतिनिधी म्हणून आज गांधी जयंतीचे औचित्य साधून करत आहे. या आंदोलनाची दखल कोकण रेल्वे प्रशासनाने, रेल्वेबोर्डाने घ्यावी ही या निमित्ताने विनंती, असे बोलून आपले स्थानक स्वच्छ ठेवा, असा संदेश देत बापू पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 04-10-2025

Amey jwelrs