देवरूख : बेडकिहाळ, कर्नाटक येथे दसरा महोत्सवानिमित्त देवरुखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांनी फक्त २३ तासांत १२ फूट बाय १७ फूट आकारात साकारलेली छत्रपती संभाजी महाराज यांच्या ‘छावा’ चित्रपटाच्या मुख्य पोस्टरची रांगोळी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.
या भव्य रांगोळीसाठी विलास रहाटे यांनी २० किलो रांगोळीचा वापर केला आहे. कर्तव्य फाऊंडेशनतर्फे कुसुमावती मिरगी महाविद्यालयाच्या सभागृहात दसऱ्यापासून या रांगोळी प्रदर्शनास सुरुवात झाली आहे. या प्रदर्शनास रांगोळीप्रेमींचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. गेली ७ वर्षे बेडकीहाळ येथील दसरा महोत्सवासाठी विलास रहाटे यांना सन्मानाने रांगोळी साकारण्यासाठी आमंत्रित केले जाते. प्रत्येकवर्षी गाजणाऱ्या एखाद्या चित्रपटाच्या प्रमुख पोस्टरची प्रदर्शनीय रांगोळी काढली जाते. यावर्षी रहाटे यांनी ‘छावा’ चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांना साखळदंडात कैद करतानाचे दृश्य रांगोळीत साकारले आहे.
रहाटे महाविद्यालयीन विद्यार्थीदशेत असल्यापासून या दसरा महोत्सवात भव्यदिव्य रांगोळी साकारत आहेत. यापूर्वी विलास यांनी महाभारत, रामायण, पुष्पा, कांतारा, नरवीर तानाजी इत्यादी सिनेमा विषयक पोस्टरवर आधारित रांगोळ्या साकारून कर्नाटक राज्यात आपला नावलौकीक वाढवला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 09/Oct/2025














