Rajapur : ओणी-पाचल, पाचल-जवळेथर रस्त्यावरील खड्डे चार दिवसांत भरणार;सार्वजनिक बांधकाम उपविभागने दिली ग्वाही

पाचल : सातत्याने पडणारा मुसळधार पाऊस, खचलेल्या मोऱ्या, गायब झालेल्या साईडपट्टया आणि रस्ता दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे झालेले अक्षम्य दुर्लक्ष यामुळे ओणी-पाचल व पाचल-जवळेथर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या धोकादायक रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करा, अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपचे राजापूर पूर्व विभाग उपाध्यक्ष प्रदीप गांधी व ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत लिंगायत यांनी एका लेखी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजपूर यांना दिले आहे. या निवेदनाची दखल घेत येत्या चार दिवसांत या दोन्ही रस्त्यांवरील खड्डे डांबराने भरण्याची ग्वाही बांधकाम विभागाने दिली आहे.

बांधकाम विभागाने यापूर्वी तीन वेळा या रस्त्याची मलमपट्टी करून जनतेची दिशाभूल केली आहे. सकाळी माती व मुरुम टाकून केलेली दुरुस्ती संध्याकाळी पुन्हा खड्ड्यात जायची. या प्रकाराने जनतेमध्ये कमालीची नाराजी तथा संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दोन जिल्ह्यांना जोडणारा हा अतिशय महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. मात्र, खराब रस्त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशी एखादी घटना घडल्यास त्याला बांधकाम विभागाच जबाबदार राहील, असा स्पष्ट इशारा देखील प्रदीप गांधीं यांनी दिला आहे. बांधकाम विभागाने येत्या चार दिवसांत दिलेल्या शब्दाप्रमाणे या रस्त्यावरील खड्डे तत्काळ भरावेत, अन्यथा जनतेच्या या प्रश्नासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा स्पष्ट इशाराही गांधीं यांनी दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 11/Oct/2025

Physciobot