Cough syrup : जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात आलेले खोकल्याचं औषध मध्य प्रदेशमधून…?

संगमेश्वर : मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये खोकल्याच्या औषधामुळे अनेक बालकांचा मृत्यू झाला. त्यामुळे संबंधित कंपनीवर व औषधावर बंदी घालण्यात आली; तसेच औषध कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातही शासकीय रुग्णालयातून आलेले खोकल्याचे औषधदेखील मध्य प्रदेशमधूनच आले असून, त्याचीही चौकशी व तपासणी व्हावी, अशी जनतेची मागणी आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातसुद्धा मध्य प्रदेशमधूनच आलेल्या खोकल्यांचे औषध शासकीय रुग्णालयात वापरले जात असून, त्या औषधांबाबतही जनतेच्या मनात संशय आणि संभ्रम निर्माण झाला आहे. या संशयाचे निरसन शासकीय यंत्रणेमार्फत होणे जिल्ह्यात सध्या गरजेचे आहे. अनेक ठिकाणी खोकल्याचा कहर झाला असून, गणपती उत्सवापूर्वीच अनेक गावांतून खोकल्याचे अनेक रुग्ण वीस-पंचवीस दिवस खोकतच असल्याचे चित्र दिसत होते. हा खोकला अनेक दिवस त्रास देत राहतो. अनेक औषधं केली तरी हा खोकला कमी होत नाही. रात्री या खोकल्याला फार जोर असतो. घशात खवखव येत राहते. त्यामुळे सतत खोकून खोकून जीव मेटाकुटीला येत असतो.

अन्य राज्याच्या काही भागात कफ सिरप प्यायल्याने मुलांचे मृत्यू ओढवण्याच्या घटना घडल्या आहेत. संगमेश्वर तालुक्यात आरोग्य विभागाकडून पुरवण्यात आलेले कफ सिरप जरी इंदोर मध्यप्रदेश येथील असले तरी, ते धोकादायक नाही. संगमेश्वर तालुक्याच्या कोणत्याही प्राथमिक आरोग्यकेंद्रातून या कफ सिरपबाबत कोणतीही तक्रार आपल्यापर्यंत आलेली नाही. तालुक्याच्या प्राथमिक आरोग्यकेंद्रांना याबाबत विचारणा केली जाईल आणि योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या जातील. – गोविंद मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी, संगमेश्वर

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 PM 11/Oct/2025