चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम अंतर्गत प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीतील मतदार नोंदणी संदर्भात आक्षेप व तक्रारी घेण्याचा १४ रोजी शेवटचा दिवस असून, काही माजी नगरसेवकांसह इच्छुकांनी या यादीत मतदार नोंदणीमध्ये चुका झाल्याचे निदर्शनास आणत त्या संदर्भात तक्रार व आक्षेप घेणार असल्याची माहिती दिली. याबाबत सोमवारी काहीजण तक्रारी दाखल करणार असल्याचे सांगितले जाते.
न्यायालयाच्या निर्देशानुसार ३१ जानेवारी २०२६ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या सूचनेची अंमलबजावणी करताना निवडणूक आयोगाकडून प्रशासनाला निवडणूक नियोजन कार्यक्रमाचे निर्देश देण्यात आले आहेत.
त्यानुसार पहिल्या काही टप्प्यातील नियोजन पूर्ण झाले आहे. प्रामुख्याने नगराध्यक्ष व नगरसेवक आरक्षण हा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. त्यानंतर आता प्रभाग रचना, प्रभागाची मतदार नोंदणी व संख्या या कार्यक्रमांचीदेखील काहीअंशी पूर्तता झाली आहे; मात्र याबाबत आक्षेप व तक्रार करण्यासाठी दि. १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत असून त्या मुदतीत मतदार यादीतील चुकांसंदर्भात आक्षेप घेण्याची मुदत संबंधित तक्रारदारांना देण्यात आली आहे. काही माजी नगरसेवकांसह इच्छुक नगरसेवकांनी मतदार यादीत घोळ झाल्याचे निदर्शनास आल्यावर निवडणूक कार्यक्रम नियोजन अंतर्गत काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणल्याचे सांगितले जाते. तसेच संबंधितांकडून मंगळवारपर्यंत तक्रारी दाखल केल्या जाणार असून दोन दिवसांत काही इच्छुक व माजी नगरसेवक याबाबत तक्रारी दाखल करणार असल्याचे समजते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 13/Oct/2025














