Devrukh : श्री सद्‌गुरु लोकमान्य वाचनालय आयोजित लेख स्पर्धेत प्रांजली आफळे व आदित्य फड प्रथम क्रमांक

देवरूख : देवरूखमधील श्री सद्‌गुरु लोकमान्य वाचनालयाने आयोजित केलेल्या माजी ग्रंथपाल स्व. ल. वा. साने गुरुजी स्मृती खुल्या लेख स्पर्धेचा (वर्ष आठवे २०२५) निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेत नाशिकच्या प्रांजली अजय आफळे आणि पुण्याचे आदित्य नागनाथ फड या दोघांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

“होय! माझी मराठी, समृद्ध मराठी !!” या विषयात नाशिकच्या प्रांजली अजय आफळे प्रथम, तर “मराठी भाषा आणि परप्रांतीय” या विषयात पुण्याचे आदित्य नागनाथ फड प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. होय! माझी मराठी, समृद्ध मराठी !! या विषयाकरिता एकूण ५० लेख महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून आले होते. या विषयात मज्जिद अब्दुल्ला काझी, कासे- संगमेश्वर यांनी द्वितीय क्रमांक, तर निवृत्ती सयाजी जोरी, छत्रपती संभाजीनगर यांनी तृतीय क्रमांक पटकाविला आहे. तसेच उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी स्वाती जोशी- कोल्हापूर, मुग्धा टेंगशे- कोल्हापूर, सरिता गोखले- देवरुख, माधवी भूत-नागपूर, डॉ. राजेश जोशी- सातारा, रेखा सोनारे नागपूर, अश्विनी भावे पुणे, वर्षा काळे- रत्नागिरी, प्रेरणा खवळे- देवरुख आणि आर्या पेंढारकर-काटवली, देवरुख यांची निवड करण्यात आली आहे. मराठी भाषा आणि परप्रांतीय या विषयासाठी एकूण १७ लेख महाराष्ट्रातील विविध भागातून आले होते. या विषयात स्पृहा सुरेश इंदू, मुंबई यांनी द्वितीय क्रमांक, तर श्रीपाद दामोदर टेंबे, पुणे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला आहे. तसेच उत्तेजनार्थ वर्षा शरद पोंक्षे, माखजन आणि रवींद्र भालचंद्र भागवत, कल्याण यांची निवड करण्यात आली आहे.

होय ! माझी मराठी, समृद्ध मराठी !! या विषयासाठी परीक्षक म्हणून मीरा पोतदार, चिपळूण यांनी, तर मराठी भाषा आणि परप्रांतीय या विषयासाठी परीक्षक म्हणून प्रा. गौतम ब्रह्मे चिपळूण यांनी काम पाहिले. दोन्ही विषयातील प्रथम क्रमांकाना रुपये १०००, द्वितीय क्रमांकाला रुपये ७५०, तर तृतीय क्रमांकाला रुपये ५०० पारितोषिकासह ग्रंथ भेट आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे. उत्तेजनार्थ निवडण्यात आलेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि ग्रंथ भेट तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सर्व विजयी स्पर्धकांचे वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. गजानन जोशी आणि सर्व कार्यकारी मंडळ सदस्यांनी अभिनंदन करून, सर्व सहभागी स्पर्धकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. लेख स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नजीकच्या काळात आयोजित केला जाईल आणि मान्यवरांचे हस्ते पारितोषिक वितरण केले जाईल. सर्व स्पर्धकांना त्याचे निमंत्रण पाठवण्यात येणार असल्याचे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:00 PM 14/Oct/2025

Shanti 3