Chiplun Walawalkar Hospital : वालावलकर रुग्णालयात सर्पदंशाच्या ६५ रुग्णांना जीवदान !

चिपळूण : दरवर्षी पावसाळ्यात व भात कापणी दरम्यान सर्पदंश झालेले अनेक रुग्ण उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल होतात. गेल्या वर्षभरात सर्पदंशाने वालावलकर रुग्णालयात तब्बल ६५ रुग्ण दाखल झाले होते. या सर्वांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले.

साप चावल्यावर रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांमध्ये पुढील लक्षणे दिसून आली. साप चावल्यामुळे प्रथम भीती आणि मग हळू हळू श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. हात पायाची शक्ती क्षीण होत गेली.

डोळ्यांच्या पापण्या जड झाल्या आणि मग मात्र श्वाससुद्धा घेणे अवघड झाले. त्यामुळे प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन रुग्ण बेशुद्ध झाले. प्रयत्न करूनही पापणी सुद्धा उघडता येत नव्हती. अशी लक्षणे दिसून आल्यानंतर मग त्यांच्या घरच्यांनी ताबडतोब डेरवण येथील वालावलकर रूग्णालयात दाखल केले. रूग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी त्यांना तपासले. योग्य त्या सर्व तपासण्या केल्या व तातडीने उपचार सुरू केले. वालावलकर रूग्णालयात अत्याधुनिक सुविधा, सुसज्ज पॅथलॉजी लॅब, अति दक्षता विभाग, डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, टेक्निशनचा चमू, सर्प दंशावरची इंजेशन्स उपलब्ध आहेत. कृत्रिमरित्या व्हेंटिलेटरद्वारे अनेक दिवस सर्व रुग्णांना श्वास द्यावा लागला. रुग्णांवर योग्य उपचार वेळेत करण्यात आले. विंचू, सर्पदंश झालेल्या सर्व रुग्णांना वालावलकर रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजनाचा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नेताजी पाटील यांनी दिली.

दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात भात कापणीच्या दरम्यान शेतकरी शेतात असतात. त्यावेळी भात कापल्यामुळे आणि अतिउष्ण हवामानामुळे सर्प व विंचू बाहेर पडतात आणि सर्प विंचूदंशाचे प्रमाण वाढते. त्यामुळे यावेळी शेतकरी बांधवांनी काळजी घेण्याचे आवाहन रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सर्पदंश टाळण्यासाठीच घ्या काळजी
सर्पदंशाचे प्रमाण कमी करण्यासाठी आपण सगळ्यांनी योग्य ती पावले उचलली पाहिजे. आपल्या घराजवळचा परीसर स्वच्छ ठेवला पाहिजेत. संध्याकाळी संधीप्रकाशात बाहेर पडू नये. रस्त्यावरून रात्रीच्यावेळी चालताना टॉर्चचा उजेड असावा. शक्यतो बुटांचा वापर करावा, जेणेकरून पायाला दंश झाला तरी बूट संरक्षण करतील, घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा, झाडेझुडपे असू नयेत आणि दाराच्या फटी बंद करण्यात याव्यात म्हणजे सरपटणारे जनावर घरात घुसू शकणार नाही. जर शक्य असेल तर कॉटवर झोपावे. कापणीच्या दिवसात सरपटणाऱ्या जनावरांना लपण्यास जागा उरत नाही आणि मग अशी जनावरे रस्त्यावर आणि घरात येऊ शकतात. त्यामुळे वरील खबरदारी घेऊन स्वतःचे आणि कुटुंबाचे संरक्षण करावे, असे आवाहन वालावलकर रुग्णालयाच्या संचालिका डॉ. सुवर्णा पाटील यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 15/Oct/2025