लोटे गुरुकुल प्रकरणात शिवसेनेचा पुढाकार; पीडित मुलीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च शिवसेना उचलणार

◼️ जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांनी दिले आश्वासन, “न्याय मिळेपर्यंत शिवसेना तिच्या पाठीशी ठाम उभी राहील”

खेड (प्रतिनिधी) : लोटे येथील “आध्यात्मिक वारकरी गुरुकुल” मध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणानंतर खेड तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर पीडित मुलगी आणि तिच्या पालकांनी न्यायासाठी थेट खेड तालुका शिवसेना कार्यालय, भरणे येथे धाव घेतली. त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना आपली व्यथा सांगत न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
या घटनेची दखल घेत शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांनी तत्काळ मुलगी आणि तिच्या पालकांची भेट घेतली. त्यांनी या प्रकरणात पूर्णपणे पाठिंबा देण्याचे आश्वासन देत, पीडित मुलीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च शिवसेना संघटनेच्या वतीने उचलला जाणार असल्याची घोषणा केली. “मुलगी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येईल, तिचे भविष्य सुरक्षित राहील, याची जबाबदारी आता शिवसेनेची आहे,” असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

यावेळी शशिकांत चव्हाण म्हणाले, “ही घटना अत्यंत संतापजनक असून, समाजात अध्यात्म आणि संस्काराच्या नावाखाली घडणारे असे प्रकार अक्षम्य आहेत. या प्रकरणातील आरोपींना कायद्याने कठोर शिक्षा मिळावी यासाठी आम्ही प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करू. न्याय मिळेपर्यंत शिवसेना तिच्या पाठीशी ठाम उभी राहील.” यावेळी खेड तालुका शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनीही एकमुखाने पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचा निर्धार व्यक्त केला.

दरम्यान, लोटेतील या गुरुकुल प्रकरणाची चौकशी खेड पोलिसांकडून सुरू असून जिल्ह्यातील शिवसेनेच्या या पुढाकाराचे विविध सामाजिक संघटना आणि महिलानी स्वागत केले असून, “राजकीय पक्ष फक्त भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष मदतीला पुढे येत आहेत, हे समाजासाठी सकारात्मक उदाहरण आहे,” अशा प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.

Tata sierra

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 15-10-2025