Sangameshwar Road Railway Station : संगमेश्वरात मडगाव, जामनगर, पोरबंदर एक्स्प्रेसना थांबा देण्याची मागणी

देवरूख : संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात मडगाव, जामनगर, पोरबंदर या एक्स्प्रेसना थांबा मिळावा या मागणीचा सकारात्मक प्रस्ताव कोकण रेल्वे आणि रेल्वे बोर्डाकडे गेल्या अडीच वर्षांत तीनवेळा देऊनही अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. निसर्गरम्य चिपळूण-संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुपच्या वतीने देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती महोदयांना प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

वरील तीन एक्स्प्रेस रेल्वे थांबण्यासाठी स्थानिक आमदार, खासदार, इतर राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांनी दिलेल्या पत्रांनादेखील प्रतिसाद लाभलेला नाही. आंदोलन, उपोषण अशा अनेक मार्गांनी लक्ष वेधून घेण्याचा फोल ठरला. केवळ कोकण रेल्वे आणि रेल्वे बोडनि एक दुसऱ्याकडे बोट दाखवून वेळ निभावून नेली.

हा कोकण रेल्वे आणि रेल्वे बोडनि सामान्य रेल्वे प्रवाशांच्या भावनांशी चालवलेला निव्वळ खेळ आहे. यामुळे तीन एक्स्प्रेसना संगमेश्वर रेल्वे स्थानकात थांबा मिळावा या मागणीसंदर्भात पुन्हा एकदा पंतप्रधान आणि राष्ट्रपती महोदयांना निवेदन देण्यात आले आहे.

सद्यस्थितीत दिवसाला १,८७७प्रवासी रोज या स्थानकावर येत असून त्यातून मिळणारे उत्पन्न हे ६ कोटी रुपये इतके आहे. कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील कार्यालयात व्यवस्थापकीय संचालक यांच्या समवेत या मागण्यांसंदर्भात दोन बैठका झाल्या. रेल्वे मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांच्यासोबतही या विषयावर चर्चा झाली. मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी भेट घेतली, चर्चा केली.
पद्मश्री दादा इदाते यांनीसुद्धा या मागण्यांचा पाठपुरावा केला. तरीही येथील प्रवाशांच्या मागण्यांचा विचार होत नाही. म्हणूनच या समूहाच्या वतीने राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्याकडे धाव घेतली आहे.

Tata tiago

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 AM 16/Oct/2025