ईव्हीएम हटाव, ओबीसी जातवार जनगणनेसाठी रत्नागिरीत ‘जन आक्रोश रॅली’

रत्नागिरी : भारत मुक्ती मोर्चा, ओबीसी मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा यांच्यावतीने पुकारलेल्या राष्ट्रव्यापी ‘जन आक्रोश रॅली’चा भाग म्हणून रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी सकाळी हा धडक मोर्चा पार पडला.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोर्चाची सुरुवात झाली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि मान्यवर कांशीराम साहेब यांचा जयजयकार करण्यात आला. ‘बोल पंच्याशी-जय मूळनिवासी’, ‘ईव्हीएमने क्या किया -देश का सत्यानाश किया’, ‘गल्ली गल्ली हे शोर है- निवडणूक आयोग चोर है’, ‘ओबीसीची जातवार जनगणना झालीच पाहिजे’, ‘इव्हिएम हटाव -देश बचाव’ आणि ‘महाबोधी महाविहार -मुक्त करा’ अशा विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मुस्लिम, ख्रिस्ती, बौद्ध, आदिवासी आणि एस.सी./एस.टी./ओबीसी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती व आरक्षणाच्या अंमलबजावणीतील अन्यायाला वाचा फोडण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

या मोर्चाचे नेतृत्व जिल्हा बामसेफचे समाधान पैठणे, भारत मुक्ती मोर्चाचे विजय जाधव, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे संजय आयरे, भीम आर्मीचे प्रदीप पवार, बहुजन मुक्ती पार्टीचे अशोक पवार आणि कुणबी समाज क्रांती संस्थेचे सलिल डाफले सर यांनी केले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर विद्यार्थी संघटनेचे सौरभ आयरे, सलिल डाफले, विजय पवार, विजय जाधव, सामाजिक कार्यकर्ते युयुस आर्ते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रशांत साळुंखे, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे जिल्हाध्यक्ष काझी साहेब, उबाठा गटाच्या सरपंच नम्रता बिर्जे, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे प्रदेश सचिव बशीरभाई मुर्तूजा आणि आर.पी.आय.चे प्रकाश जाधव यांच्यासह अनेक राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी यात सक्रिय सहभाग घेतला. या मान्यवरांनी ईव्हीएम हटाव आणि इतर मागण्यांना आपला पूर्ण पाठिंबा व्यक्त केला. ईव्हीएम हटवले नाही, तर सनदशीर मार्गाने भविष्यात आणखी उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी मोर्चाच्या वतीने देण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:08 16-10-2025

Samarth gold