झोपडपट्टी पुनर्विकास आराखडा तयार करा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रत्नागिरी : चिपळूण आणि रत्नागिरी शहरातील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास आराखडा तयार करावा. त्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना यांचा आधार घ्यावा. शासनाकडे जे प्रस्ताव प्रलंबित आहेत त्या प्रस्तावांची यादी द्यावी. ते मार्गी लावू, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

शासकीय विश्रामगृहात गुरुवारी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला पालकमंत्री डॉ. उदय सामंत, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, माजी आमदार राजन साळवी आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रथम पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. ते म्हणाले, शेतकरी, सर्वसामान्य नागरिक यांचे जे नुकसान झाले असेल, त्याची भरपाई देऊन टाका. जिल्ह्याचे काही शासनाकडे प्रलंबित प्रस्ताव असतील, त्याची एकत्रित यादी द्या. सिंधुरत्न योजनेबाबतही प्रस्ताव द्यावा.

रत्नागिरी, चिपळूण सारख्या शहरात असणाऱ्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्याबाबत आराखडा तयार करावा, प्रशस्त मोकळी जागा, बाग-बगीचा असा चांगला प्रस्ताव तयार करावा. त्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास आराखडा, प्रधानमंत्री आवास योजनांचा आधार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्री यांच्या दीडशे दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमांर्गत रत्नागिरी पोलिस दलाचे नावीन्यपूर्ण उपक्रम दर्शवणाऱ्या फलकांचे उपमुख्यमंत्र्यांच्याहस्ते यावेळी प्रकाशन करण्यात आले.

पाच स्वयंसहाय्यता समूहांना कर्ज वाटप
लघुउद्योगांच्या माध्यमातून स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी स्वयंसहाय्यता समुहांना २०२५-२६ या आर्थिक वर्षात कर्ज वाटप करण्यात आले आहे. शिवपार्वती महिला बचतगट मुरुगवाडा, शाहनूर अलिबाबा महिला बचतगट राजिवडा यांना मासे विक्रीसाठी अनुक्रमे ८ व ६ लाख रुपये, राजसा महिला बचतगट परटवणे बेकरी पदार्थ करण्यासाठी ४ लाख रुपये, कृष्णाई महिला बचतगट परटवणे पर्स बेंग तयार करण्यासाठी १० लाख रुपये आणि संजीवनी महिला बचत गट क्रांतीनगर यांना विविध प्रकारचे पीठ तयार करण्यासाठी १० लाख रुपये असे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याहस्ते कर्ज वाटप करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 18/Oct/2025