रत्नागिरी : जनसेवा ग्रंथालयाच्या वतीने देण्यात येणारा ‘उत्कृष्ट वाचक पुरस्कार’ प्रदान सोहळा वाचक प्रेरणा दिनानिमित्त जनसेवा ग्रंथालयात झाला. ज्येष्ठ लेखिका स्मीता राजवाडे यांच्या संकल्पनेतून जनसेवा ग्रंथालयातर्फे दरवर्षी उत्कृष्ट वाचक पुरस्कार देण्यात येतात. जनसेवा ग्रंथालयाच्या सभासद वाचकांमधून जनसेवा ग्रंथालयाची पुरस्कार निवड समिती विजेत्यांची निवड करते. यावर्षी बालगटातून दोन व मोठ्या गटातून दोन अशा चार वाचकांना उत्कृष्ट वाचक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये बालगटातून शारदा अभ्यंकर व स्पृहा भावे या विद्यार्थिनी, तर मोठ्या गटातून नरेश पाडळकर व श्रीया पटवर्धन हे उत्कृष्ट वाचक पुरस्कार विजेते ठरले. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्याहस्ते पुरस्कार विजेत्यांना सन्मानपत्र, पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी बालवाचकांनी वाचन आवडीविषयी मनोगते मांडली. अमोल पालये यांनी पुरस्कार निवड प्रक्रिया समजावून सांगितली. कार्यक्रमाला ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी, कार्याध्यक्ष राहुल कुलकर्णी, ग्रंथपाल अनुजा पटवर्धन, ग्रंथालय कर्मचारी सुजाता कोळंबेकर, भासेले आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 18/Oct/2025














