Sangameshwar : सप्रेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारला किल्ले प्रतापगड

साखरपा : देवधामापूर (ता. संगमेश्वर) येथील सप्रेवाडी शाळेत विद्यार्थ्यांनी किल्ले प्रतापगडची प्रतिकृती साकारली आहे. १५ बाय ६ फूट आकाराची ही प्रतिकृती पंचक्रोशीत आकर्षणाचा विषय ठरत आहे. शासनातर्फे दुर्गोत्सव २०२५ ही संकल्पना जाहीर करण्यात आली आहे. दिवाळी आणि किल्ले यांचे नाते बऱ्याच वर्षांपूर्वीपासून अतूट आहे. याचा एक भाग म्हणून दुर्गोत्सव संकल्पना राबवण्यात येत आहे. यूनेस्कोतर्फे जाहीर झालेल्या १२ किल्ल्यांपैकी कोणत्याही एका किल्ल्याची प्रतिकृती साकारून त्याचे फोटो शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करायचे आहेत.

या संकल्पनेला प्रतिसाद म्हणून देवधामापूर येथील सप्रेवाडी शाळेत विद्यार्थ्यांनी किल्ले प्रतापगडची भव्य प्रतिकृती साकारली. शाळेच्या आवारात १५ फूट लांब आणि ६ फूट रुंद अशी ही प्रतिकृती आहे. त्यात किल्ल्यावरील महत्त्वाच्या वास्तू आणि स्थळे दाखविण्यात आली आहेत. शाळेचे उपक्रमशील शिक्षक सतीश वाकसे यांच्या संकल्पनेतून ही प्रतिकृती साकारण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे पत्र शाळेला प्राप्त झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:21 PM 21-Oct-25

Cake of the day