Rajapur : चोऱ्या रोखण्यासाठी सीसीटीव्ही लावावेत; राजापूर पोलिस निरीक्षकांचे ग्रामपंचायतींना पत्र

राजापूर : तालुक्यात गेल्या काही दिवसांत घडलेल्या चोरीच्या घटनांची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत तपास व चौकशी सुरू केली आहे. मात्र, अनेक भागांत सीसीटीव्ही नसल्याने तपासात अडचणी येत आहेत. चोरीच्या घटना कमी करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही लावावेत, असे आवाहन राजापूरचे पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी केले आहे. याबाबत त्यांनी ग्रामपंचायतींना पत्रही दिले आहे.

राजापूर पोलिस स्थानकाच्या हद्दीमध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. अनेक भागांत वाहनचालक व दुचाकीस्वारांकडून गाड्या लॉक केल्या जात नाहीत. तसेच हॅण्डलही लॉक केले जात नाही. तर अनेक मंदिरांमध्ये दानपेट्या आहेत; पण मंदिर उघडी ठेवलेली आहेत. तसेच अनेक बंद घरांमध्ये रोख रक्कम व दस्तऐवज ठेवले जात असल्याचे निदर्शनाला आले आहे.

घराशेजारील ओळखीच्या व्यक्तींना सकाळी व सायंकाळी बंद घराकडे फेरी मारून लक्ष ठेवण्यासाठी सांगावे. शक्य असल्यास घराच्या दर्शनी व पाठीमागील भागात सीसीटीव्ही बसवावेत. शक्य झाल्यास रहदारीचा रस्ताही कॅमेरामध्ये घेण्याचा प्रयत्न करावा. घराबाहेर लावण्यात आलेल्या वाहनांना हँडल लॉकसोबतच इतरही चांगल्या पद्धतीचे लॉक लावावे. गावातील मंदिरे ही सायंकाळी बंद राहतील, याची काळजी घ्यावी. घराशेजारी गावामध्ये कोणीही संशयित व्यक्ती दिसल्यास त्याचे फोटो काढून पोलिसांना कळवावे, असे आवाहन यादव यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:09 PM 22/Oct/2025

Samarth gold