Ratnagiri : रेशनवर दोन महिने मिळणार ज्वारी; रत्नागिरीत गहूच

रत्नागिरी : सरकारने यंदा ज्वारीचे पीक राज्यात अधिक आल्याने राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये गव्हाऐवजी ज्वारी पुढील दोन महिन्यांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार या १४ जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबरपासून पुढील दोन महिन्यांसाठी रेशन दुकानांतून ज्वारीचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यासाठी अजूनही तसा काही निर्णय आलेला नसल्याने आहे तेच वितरण सुरू राहणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी विक्रमी प्रमाणात ज्वारीचे उत्पादन केले होते. परिणामी, राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर ज्वारीची खरेदी केली आहे. राज्यातील पुणे शहर, पुणे जिल्हा, सातारा, सांगली, नांदेड, परभणी, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, लातूर, सोलापूर, हिंगोली, वर्धा आणि नागपूर या चौदा जिल्ह्यांमधील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थीना गव्हाऐवजी १ किलो ज्वारी दिली जाणार आहे. रत्नागिरीसाठी अद्याप तसा निर्णय कळविण्यात आलेला नाही.

ज्वारी आरोग्यदायी आणि पौष्टिक धान्य
ज्वारी पौष्टिक आणि आरोग्यदायी धान्य म्हणून ओळखली जाते. या उपक्रमामुळे या लाभार्थीच्या अन्न सुरक्षेसोबतच त्यांना दोन महिने ज्वारीसारखे पौष्टिक धान्य मिळणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात धान्याचे नियमितपणे वितरण
ज्वारीच्या वितरणाबाबत जिल्हा प्रशासनाला अद्याप कोणतीच सूचना न मिळाल्याने प्राधान्य आणि अंत्योदय गटातील लाभार्थ्यांना नियमित नियमन दिले जाते, त्याप्रमाणे पुरवठा विभागाकडून वितरण केले जाणार आहे

आनंदाचा शिधाही आता झाला गायब !
ऑक्टोबर २०२२ मध्ये सरकारने आनंदाचा शिधा सुरू केला होता. मात्र, ही योजनाही आता सरकारने बंद केली आहे.

कोणत्या गटाला किती धान्य मिळते ?
राष्ट्रीय अन्न सुरक्षेतील प्राधान्य गटाला रेशनवर प्रति सदस्य पाच किलो धान्य दिले जाते. अंत्योदय गटाला प्रति कार्ड ३५ किलो धान्य दिले जाते.

जिल्ह्यात एकूण किती रेशन कार्डधारक आहेत?
रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ३,८२,४६५ कार्डधारक आहेत.

अंत्योदयचे ३८,८४३ :
रत्नागिरी जिल्ह्यात ३९,१३० एवढे अंत्योदय गटातील कार्डधारक आहेत.

प्राधान्यचे २,४४,२८३:
प्राधान्य गटातील २,४४,२८३ एवढे रेशनकार्डधारक आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:02 PM 24-Oct-25