Jelly Fish : गणपतीपुळे समुद्रकिनारी जेलीफिशचे संकट

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे सध्या दिवाळी सुट्टीसह पर्यटन हंगाम सुरू असताना येथील समुद्रकिनाऱ्यावर भाविक तसेच पर्यटकांची गर्दी झालेली दिसून येत आहे. गणपतीपुळे भेटीवर आलेल्या पर्यटकांना येथील समुद्रकिनाऱ्याची भुरळ पडत असून, त्यांना विलोभनीय समुद्रकिनारा व समुद्राच्या पाण्याचा मोह आवरता येत नाही. अशातच सध्या येथील येथील समुद्रकिनाऱ्यावर जेलीफिशचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य पसरले आहे.

यामध्ये समुद्रस्नान करताना पाण्यामध्ये असलेल्या जेलीफिशचा स्पर्श होऊ लागल्यामुळे अनेक भक्त व पर्यटक हैराण होत असून, सर्वच ठिकाणच्या येणाऱ्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जेलीफिशविषयी स्थानिक ग्रामस्थ आणि व्यावसायिकांकडून देण्यात येणाऱ्या माहितीनुसार जेलीफिशचा स्पर्श होताच अंगाला खूप वेदना होतात. स्पर्शामुळे अंगावर बारीक पुरळ व स्पर्श झालेल्या ठिकाणचा भाग लालेलाल होतो. तसेच जेलीफिशचा शरीराला स्पर्श झाल्याने वेदनेमुळे पर्यटक त्या ठिकाणी हाताने चोळतात. त्यामुळे आणखीनच त्रास होतो.

जेलीफिशशी संपर्क आल्यास काही वेळा जवळजवळ चार ते पाच तास वेदना होत राहतात तर काहींना तापही येतो. त्यामुळे जेलीफिशचा स्पर्श झाल्यास व लागल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. सध्या किनाऱ्यावर जेलीफिशचे अस्तित्व आढळल्याने पर्यटक तसेच भाविकांनी समुद्रात जेलीफिश ज्या ठिकाणी असतील तेथे पाण्यात उतरू नये, असे आवाहन स्थानिक ग्रामस्थ, किनाऱ्यावरील व्यावसायिक, ग्रामपंचायत, देवस्थान समिती आणि पोलिस यंत्रणा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Tata tiago

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 PM 28/Oct/2025