Chiplun : चिपळुणात मतदार यादीत घोळ? ९५ टक्के हरकती मान्य

चिपळूण : शहरातील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. या बाबतची सुनावणी २७ऑक्टोबर रोजी प्रांताधिकारी आकाश लिगाडे व न.प. मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी घेतली. १५१ जणांच्या हरकतींवर झालेल्या सुनावणीत ९५ टक्के हरकती मान्य केल्या असून त्यावर प्रत्यक्ष पंचनामे करून तोडगा काढला जाईल, असे सांगण्यात आले.

प्रांताधिकारी कार्यालयात ही सुनावणी झाली. यामध्ये १८ जणांनी तक्रारी केल्या होत्या. तसेच १५१ जणांच्या हरकतींवर चर्चा झाली. सध्या चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुका केव्हाही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधी मतदार यादीतील त्रुटींविषयी प्रशासनाने लोकांच्या हरकती मागविल्या होत्या.

त्यानुसार नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. यामध्ये चुकीच्या प्रभागात नावे गेल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. माजी नगरसेवक अविनाश केळसकर यांनी यादीतील घोळाविषयी आपले म्हणणे मांडले होते.

त्यात यादीतील चुकीचा बदल रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. यात बदल न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. दरम्यान, अन्य ५ टक्के नागरिकांच्या हरकती अमान्य करण्यात आल्या. याविषयी प्रांताधिकारी आकाश लिगाडे व मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी या बाबत आपले विवेचन करून हरकतदारांना निदर्शनास आणले. त्यानंतर त्यांनीही ते मान्य केले. या सुनावणीमुळे नगर परिषदेतील मतदार यादीतील घोळ आता संपेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:04 PM 29/Oct/2025