India beat Australia Semi Final Womens World Cup 2025 : महिला वर्ल्ड कप 2025 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने दमदार खेळ करत ऑस्ट्रेलियाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्या शतकी भागीदारीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाला पाच विकेट्सने पराभूत केले. या विजयासह टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी करत अंतिम फेरी गाठली आहे. आता विजेतेपदासाठी भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी रविवारी, 2 नोव्हेंबर रोजी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहे.
भारताच्या विजयाची खरी सुपरस्टार ठरली जेमिमा रॉड्रिग्ज!
जेमिमा रॉड्रिग्जने उपांत्य फेरीत नाबाद 127 धावांची अप्रतिम खेळी करत सर्वांना मंत्रमुग्ध केले. उजव्या हाताच्या या तडाखेबाज फलंदाजीनं 134 चेंडूंत 14 चौकार लगावले आणि 94.78 चा स्ट्राईक रेट राखला. दुसऱ्याच षटकात शेफाली वर्मा बाद झाल्यानंतर जेमिमानं क्रीजवर आला आणि त्यानंतर सामना पूर्णपणे आपल्या नियंत्रणात घेतला. तिनं सुरुवातीपासूनच सिंगल-डबल्ससह जबरदस्त चौकारांची आतषबाजी केली. कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत तिनं शतकी भागीदारी केली. हरमनप्रीत कौरच्या दमदार 89 धावांच्या खेळीमुळे भारतीय संघाने अवघ्या 9 चेंडू शिल्लक ठेवत विजय मिळवला आणि लक्ष्य सहज गाठले.
महिला वर्ल्ड कपच्या इतिहासात ही केवळ दुसरीच वेळ आहे, जेव्हा भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर मात केली आहे. यापूर्वी 2017 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला 36 धावांनी पराभूत केले होते. गतविजेती ऑस्ट्रेलियाचे आठव्यांदा विश्वविजेतेपद जिंकण्याचे स्वप्न यामुळे अपूर्णच राहिले.
भारतीय संघाने या विजयासह वर्ल्ड रेकॉर्डही आपल्या नावावर केला आहे. महिला वर्ल्ड कपच्या इतिहासात हा सर्वात मोठा यशस्वी धावांचा पाठलाग ठरला केला आहे. याआधीचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता, ज्यांनी याच स्पर्धेत भारताविरुद्ध 331 धावांचे लक्ष्य पार केले होते.
फोएबे लिचफिल्डने ठोकले जबरदस्त शतक
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. ऑस्ट्रेलियाकडून 22 वर्षीय फोएबे लिचफिल्डने जबरदस्त शतक झळकावले, तर अनुभवी एलिस पेरीने तुफानी खेळी खेळली. पण कर्णधार एलिसा हीली 5 धावा करून बाद झाली. त्यानंतर लिचफिल्ड आणि पेरी यांनी दुसऱ्या विकेटसाठी 155 धावांची भक्कम भागीदारी रचली. अमनजोतम कौरने अखेर लिचफिल्डला माघारी पाठवले. लिचफिल्डने फक्त 93 चेंडूंमध्ये 119 धावा करत अप्रतिम शतक झळकावले. तिच्या या खेळीत 17 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. त्यानंतर बेथ मूनी 22 चेंडूत 24 धावा करून बाद झाली, तर एनाबेल सदरलँड केवळ 3 धावांवर माघारी फिरली.
एलिस पेरीची दमदार 77 धावांची खेळी
एलिस पेरीने 88 चेंडूंमध्ये 77 धावा केल्या आणि तीही बाद झाली. एश्ले गार्डनरने आक्रमक खेळ करत 45 चेंडूंमध्ये 63 धावा केल्या, मात्र ती रनआउट झाली. अखेर ताहलिया मॅक्ग्रा (12) आणि किम गर्थ (17) यांनी थोडेसे योगदान दिले. भारताकडून श्री चरणी आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या, तर राधा यादव, क्रांती गौड आणि अमनजोतम कौरला प्रत्येकी 1 यश मिळाले आणि ऑस्ट्रेलिया 49.5 षटकांत 338 धावांवर गारद झाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 31-10-2025














