रत्नागिरी : खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात भात, नाचणी पिकांची पेरणी करण्यात आली असून काही पिके वाहून गेली, तर काही पिके कापणी करून झोडणी, मळणी करण्याच्या काम पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे यंदाचा रब्बी हंगामच्या पेरण्याला उशिर होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या वर्षी ५ हजार हेक्टरवर रब्बीच्या पेरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अद्याप रब्बीची तयारी सुरू झालेली नसून कृषी विभागाच्या वतीने बियाणे, खत वितरण करण्यासाठी नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. यंदाच्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरिपाच्या भात शेतीला पावसाचा वारंवार फटका बसला आहे. अशा परिस्थितीत भात पिके चांगल्याप्रकारे आली होती. मात्र परतीच्या पावसामुळे व अवेळी, अवकाळी पावसामुळे १७० हेक्टर क्षेत्रावरील भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे हळव्या भात पिकाची उत्पादकता घटली आहे. मात्र गरवे, निमगरवे भात पीक उत्तम आहे, परंतु तयार पीक कापणीसाठी पावसाचा अडसर निर्माण झाला आहे. कापलेले भात वाळत नसल्यामुळे शेतकऱ्यांपुढे संकट आले आहे.
दरम्यान, रब्बी हंगामला उशीर होणार असून पेरणीला वेळ लागणार असल्याचे चित्र आहे. रब्बीच्या हंगामात शेतकरी कुळीथ, संकरित, मका, पावटा, कडधान्य यासारख्या विविध प्रकारच्या भाज्यांच्या बियांणाची पेरणी करीत असतो. भात पिकांची कापणी, झोडणी झाल्यानंतर नांगरणी करून बियाणे पेरणी करणार असून त्यासाठी आणखी काही दिवस जाण्याची शक्यता आहे. खरीप पिके गेली आता रब्बी पिके तारणार का, असा प्रश्न कोकणातील शेतकऱ्यांसमोर आहे. जिल्ह्यातील शेतकरी रब्बी हंगामात कुळीथ, पावटा, हरभरा, मूग, वाल कडधान्यांसह पालेभाज्या, मिरची, वांगी, नवलकोल या भाज्यांची लागवड केली जाते.
खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात भात पिकांचे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामाची तयारी कृषी विभागाच्या वतीने करण्यास सुरुवात झाली. चांगल्या प्रकारची बियाणे, खते देण्यासाठी प्रयत्न राहील. यंदा ५ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी होईल- शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 PM 31/Oct/2025














