रत्नागिरी : दिवाळीचा सण संपला तरीही शाळा, महाविद्यालयांना २ नोव्हेंबरपर्यंत सुट्टी आहे; परंतु सुट्यांचा फायदा घेऊन पर्यटन, देवदर्शनासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रवासासाठी एसटीला अधिक पसंती दिली जात आहे. त्यामुळे बस हाऊसफुल्ल भरून धावत आहेत. रत्नागिरी विभागातून मुंबई, पुण्यासह लांबच्या पल्ल्यासाठी नियमित १५० गाड्या धावतात याशिवाय १७ ऑक्टोबरपासून १५ जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत.
दिवाळी सुटीमुळे नातेवाइकांकडे, पर्यटनासाठी, देवदर्शनासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या पर्यटकांसह बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्याही वाढल्यामुळे बसस्थानकांवर प्रवाशांची गदर्दी आहे. प्रवाशांमुळे लांब तसेच ग्रामीण मार्गावरील बस प्रवाशांनी फुल्ल भरून धावत आहेत. राज्य परिवहन महामंडळातर्फे महिलांसाठी तिकीटदरात पन्नास टक्के सवलत, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत तसेच अमृत ज्येष्ठ नागरिकांना तिकीटदरात शंभर टक्के सवलत देण्यात येत आहे. या सवलतीचा फायदा प्रवासी घेत आहेत. त्यामुळे महिलांसह ज्येष्ठांची एसटीला अधिक पसंती आहे. त्यामुळे एसटीच्या गाड्यांचे भारमान वाढले आहे. रत्नागिरी विभागातर्फे छत्रपती संभाजीनगर, तुळजापूर, बारामती, शनीशिंगणापूर, नृसिंहवाडी, अक्कलकोट, पंढरपूर, स्वारगेट, मिरज, पुणे, बोरिवली, नालासोपारा मार्गावर १५ जादा गाड्या १७ ऑक्टोबरपासून सोडण्यात येत आहेत. या गाड्या ५ नोव्हेंबरपर्यंत सोडण्याचे नियोजन आहे.
ऑनलाइन आरक्षण उपलब्ध
रत्नागिरी विभागाच्या नियमित गाड्यांसह दिवाळीसाठी जादा गाड्यांचे आरक्षण ऑनलाइन उपलब्ध होत आहे. त्यामुळे प्रवाशांना घरबसल्या आरक्षण करता येत आहे. गर्दीतून धक्के खात प्रवास करण्यापेक्षा आरक्षण तिकीट काढून आरामदायी प्रवास करता येत असल्याने प्रवाशांची अधिक पसंती आहे.
दिवाळीमुळे लांब पल्ल्यासह जादा तसेच ग्रामीण मार्गावरील फेऱ्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुट्टीसाठी परजिल्ह्यातील पर्यटक मोठ्या संख्येने आल्याने गाड्यांना गर्दी होत आहे. गर्दीच्या मार्गावर मागणी पाहून जादा गाड्या सोडण्यात येत आहेत- प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:17 PM 31/Oct/2025














