Scholarship Exam : पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. चौथी-सातवीच्या शिष्यवृत्तीसाठीही लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना एकूण २०० रुपये परीक्षा शुल्क असून, मागासवर्गीय व दिव्यांग संवर्गातील विद्याथ्यर्थ्यांना १२५ रुपये शुल्क आहे. हे शुल्क ३० नोव्हेंबरपर्यंत आकारले जाणार आहे. त्यानंतर विलंब शुल्क व अतिविलंब शुल्क, यासाठी वेगळे नियम लागू आहेत, पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षेबरोबरच ८ फेब्रुवारी रोजी विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा तसेच आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्तीबरोबरच या वर्षी इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. मात्र, इयत्ता चौथी व सातवीच्या विद्याथ्यांच्या परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, संबंधित शाळेने शिष्यवृत्ती
परीक्षेत बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती भरण्यास सुरुवात करावी, असे आवाहन परीक्षा परिषदेतर्फे करण्यात आले आहे.

राज्य परीक्षा परिषदेतर्फे यापूर्वी इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात होती. परंतु, काही वर्षांपूर्वी त्यात बदल करून ही परीक्षा इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यास सुरुवात झाली. परंतु, या निर्णयामुळे परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत गेली. त्यामुळे राज्य शासनाने पुन्हा एकदा इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. यावर्षी इयत्ता पाचवी आठवी तसेच इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे.

परीक्षा परिषदेने इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भातील वेळापत्रक जाहीर केले असले तरी इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भातील अभ्यासक्रम, अधिकृत सूचना व इतर आनुषंगिक माहिती गधावकाश परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे इयत्ता चौथी व सातवीच्या विद्याथ्यर्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

परीक्षेच्या तारखेत बदल करावा…
राज्यातील सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक शिक्षक टीईटी परीक्षेची तयारी करत आहेत. सीटीईटी परीक्षा ८ फेब्रुवारी रोजी घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा आणि शिक्षकांची सीटीईटी परीक्षा एकाच दिवशी आली आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:29 PM 31/Oct/2025