गुहागर : गुहागर-विजापूर महामार्गासाठी रामपूरपर्यंत भूसंपादनाची कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता भूमी अधिग्रहण प्रक्रिया थांबणार नाही. केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या जमीन मालकांच्या खात्यात पैसे जमा केले जात आहेत. प्रत्यक्ष महामार्गाचे बांधकाम कधी सुरू होणार हा विषय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणशी संबधित आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांनी दिली.
गुहागर-विजापूर महामार्गासाठी गुहागरमधील भूमी अधिग्रहणाला सुरुवात झाली. तत्पूर्वी उपविभागीय अधिकारी लिगाडे यांनी तहसीलदारांसमवेत गुहागरमधील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने जेसीबी लावून तोडू नयेत, आम्ही इमारतींमधील लाकूड सामान व अन्य गोष्टी स्वतः काढू अशी विनंती केली. त्याला संमती देताना प्रांताधिकारी लिगाडे म्हणाले की, वास्तविक मे २०२३ चा अल्टिमेटम तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिला होता, परंतु भूसंपादनाची प्रक्रिया अर्धवट असल्याने आम्ही जमीन अधिग्रहीत केली नाही.
आपल्याला सगळ्यांना जून २०२५ मध्ये ६० दिवसांची अंतिम नोटीस मिळाली होती. ती मुदत संपली तरी आम्ही दुकानांना हात लावला नाही. मात्र आता आणखी मुदतवाढ मिळणार नाही. दुकानांमधील आवश्यक ते सर्व सामान आपण उचलण्यास सुरवात करावी. आपले दुकान रिकामे होत असेल तर आम्ही मुद्दाम जेसीबी लावणार नाही, पण आपल्याकडून काहीच हालचाल झाली नाही तर मात्र आम्हाला नाईलाजाने जेसीबीने दुकाने तोडावी लागतील, असे स्पष्ट शब्दात सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:41 PM 31/Oct/2025














