चिपळूण : कौटुंबिक छळाचा ‘हाय-व्होल्टेज’ ड्रामा; पोलिसात तक्रार द्यायला निघालेल्या पत्नीला पतीने बांबूच्या काठीने झोडपले, सासूनेही केस पकडून…

चिपळूण : कौटुंबिक वादातून पोलिसात तक्रार देण्यासाठी निघालेल्या एका विवाहितेला तिच्या पतीनेच बांबूच्या काठीने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यातील कौंढरे ताम्हाणे येथे घडली आहे. एवढेच नाही, तर सासूनेही पीडितेचे केस पकडून तिला थापडांनी मारहाण केली.

याप्रकरणी पीडित विवाहिता मनाली दिपेश भोबस्कर (वय २८, रा. कौंढरे ताम्हाणे) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात (Chiplun Police Station) फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती दिपेश शिवाजी भोबस्कर (वय २८) आणि सासू श्रध्दा शिवाजी भोबस्कर (वय ६५, दोन्ही रा. कौंढरे ताम्हाणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेच्या आदल्या दिवशी, म्हणजेच २८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी मनाली यांना मारहाण झाली होती. याच मारहाणीची तक्रार देण्यासाठी त्या दुसऱ्या दिवशी, २९ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास, आपल्या लहान मुलाला (आयांश) घेऊन चिपळूण पोलीस ठाण्यात जाण्यासाठी निघाल्या होत्या.

मुलाला अडवून रस्त्यात गाठले

फिर्यादी मुलाला घेऊन निघत असताना, आरोपी पती दिपेश याने “मुलाला कोठेही घेऊन जायचे नाही, मी त्याला पाठवणार नाही,” असे म्हणत मुलाला सोबत नेण्यास मज्जाव केला. त्यामुळे मनाली या एकट्याच घराबाहेर पडून रस्त्यावर गाडीची वाट पाहत उभ्या होत्या.

नेमकी हीच संधी साधून पती दिपेश याने घरात ठेवलेली बांबूची काठी (Bamboo Stick) आणली आणि मागून येत मनाली यांच्या डाव्या हाताच्या दंडावर व डाव्या मांडीवर जोरदार प्रहार केले व शिवीगाळ केली. त्याचवेळी सासू श्रध्दा भोबस्कर यांनीही तेथे येऊन फिर्यादी मनाली यांचे केस पकडले आणि त्यांना हाताच्या थापटांनी मारहाण केली.

दोघांविरोधात गुन्हा दाखल

या हल्ल्यात मनाली भोबस्कर या जखमी झाल्या. घडलेल्या प्रकारानंतर त्यांनी ३० ऑक्टोबर रोजी चिपळूण पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हा रजिस्टर नंबर २४७/२०२५ अन्वये, भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५२, आणि ३(५) अन्वये दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:01 31-10-2025