साडवली : देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी श्रमदानातून सोनवडे येथे रस्त्यांची डागडुजी आणि रस्त्याच्या आसपास असणारे अनावश्यक गवत व झाडे-झुडपे स्वच्छ करण्याचे काम केले. पावसामुळे रस्त्यात पडलेले खड्डे, यामुळे वाहन चालवताना येणाऱ्या अडचणी व त्यातून होणारे अपघात यावर या श्रमदानातून केलेल्या उपाययोजनेमुळे ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाचे निवासी श्रमसंस्कार शिबिर सोनवडे येथील माध्यमिक विद्यालय येथे सुरू आहे. विद्यार्थ्यांनी नदीतील वाळू तसेच मऊ दगड व मातीचा वापर करून हे खड्डे बुजवण्याचे काम केले. यासाठी पोलिस पाटील अनंत जोशी तसेच सोनवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर सनगरे, संस्था सदस्य संदीप सनगरे यांनी विद्यार्थ्यांना सहकार्य केले.
विद्यार्थ्यांसोबत श्रमदानामध्ये प्रा. विजय मुंडेकर, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. वसंत तावडे, सहाय्यक स्वप्नील कांगणे तसेच सोनवडे हायस्कूलचे सहाय्यक विशाल जाधव यांनी देखील मेहनत घेतली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:36 PM 31/Oct/2025














