मुंबई : राज्यातील बहुतांश भागात पावसाने विश्रांती घेतली असली तरी काही भागात मात्र, अद्यापही पाऊस पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशातच कोकणात पावसाचा जोर कायम असल्याचे चित्र आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात लांबलेल्या पावसाचा फटका भातशेती, आंबा, काजू, मासेमारी आणि पर्यटनाला बसला आहे. सध्या कापलेली भातशेती पूर्णपणे वाया गेली असून शेतात उभी असलेली भातशेती वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावतेय. तर पाऊस लांबल्याने आंबा, काजूचा हंगाम लांबणीवर गेला आहे. समुद्र खवळलेल्या स्थितीत असल्याने मासेमारीवरही परिमाण होतोय.
2 नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत समुद्र खवळलेला, मच्छिमारांना इशारा
दरम्यान, अरबी समुद्रातील डिप्रेशन कमकुवत होत कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर होत आहे. परिणामी काही तासात कोकण किनारपट्टीवरील पावसाची तीव्रता कमी होणार असल्याची शक्यता आहे. तरी, उत्तर कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
सोबतच, पालघर, ठाणे, मुंबई आणि उपनगरात आज पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. 2 नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत समुद्र खवळलेला असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
लांबलेल्या पावसामुळे बळीराजा संकटात
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सिंधुदुर्गात सातत्याने गेले काही दिवस परतीचा पाऊस कोसळत आहे. या लांबलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले असून अनेक ठिकाणी कापलेले भात शेती वाया गेली आहे. तर आंबा आणि काजूचा हंगाम देखील लांबणीवर गेला आहे. पुढील काही दिवस सिंधुदुर्गात पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे.
ठेकेदाराचा निष्काळजीपणा, मध्यरात्री तीन फुटांपर्यत पाणी शिरले
रत्नागिरी- मुंबई गोवा महामार्गावरच्या ठेकेदाराचा निष्काळजीपणाचा फटका लांजावासीयांना बसला आहे. धुवाधार पाऊस आणि अर्धवट कामामुळे श्रीरामपूल वैभव वसाहतीजवळच्या पाच घरात पावसाचे पाणी शिरले आहे. वहाळ बुजवल्याने पाणी तुंबले असून पाच घरात मध्यरात्री तीन फुटांपर्यत पाणी शिरले आहे. तर दोन चारचाकी गाड्या आणि दोन दुचाकी गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. हि घटना घडल्यानंतर स्थानिक नगरसेवक मदतीला धावले असून जेसीबी आणि क्रेनच्या माध्यमातून पाण्याचा निचरा करण्यात आलाय. दरम्यान, या घटनेत पाच घरात पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालं असून आमदार किरण सामंत देखिल पहाणी करणार असल्याची माहीती आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 AM 01/Nov/2025














