Ratnagiri Election : ३ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद निवडणुकीची अंतिम मतदार यादी

रत्नागिरी : जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची प्रारूप मतदार यादी जाहीर करून आक्षेप मागवण्यात आले होते. तसेच आक्षेप निकाली काढून २७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार होती. मात्र राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. दुबार नावे वगळण्याची कार्यवाही पूर्ण करून ३ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करावी, असे आदेश आयोगाने दिले आहेत.

जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोग आणि ग्रामविकास विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आतापर्यंत गट, गणांची रचना, आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली. प्रारूप मतदार यादीही प्रसिद्ध केली. नगर परिषदांच्या प्रारूप मतदार यादीत मोठा घोळ झाला. त्यामुळेच १७ हजारांवर आक्षेप दाखल झाले. त्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या प्रारूप मतदार यादीवर नाममात्र आक्षेप होते. आक्षेप निकाली काढून निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार २७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार होती. मात्र राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादीसंबंधी सुधारित आदेश काढून मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे प्रशासनदेखील गोंधळून गेले आहे.

जिल्हा परिषदेच्या ६१ गटांतील मतदार यादीच्या प्रारूप रचनेवरील आक्षेपांवर सुनावणी झाली आहे. रविवारी अंतिम यादी येणार होती, मात्र आता ३ नोव्हेंबर पर्यंतची मुदत वाढवली आहे. दि. ३ नोव्हेंबर रोजी गणनिहाय छापील मतदार याद्या अधिनियमाच्या कलम १३ खाली अधिप्रमाणित करून त्या माहितीसाठी ठेवण्यात येत असल्याची सूचना प्रसिद्ध करावी. त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी मतदान केंद्राची मतदान केंद्रनिहाय मतदारयादी प्रसिद्ध करावी, असे आदेश निवडणूक आयोगाने प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे अंतिम मतदार यादीचा कार्यक्रम एक आठवडा लांबणीवर व गेला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 01/Nov/2025