Khed : खेडमध्ये ४५ गावातील भातशेती उद्ध्वस्त; शेतकऱ्यांच्या ९३.०४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

खेड : कोकणात शेती व्यावसायिक नसून वर्षभरासाठी लागेल एवढे तांदूळ मिळतील अशाप्रकारे पारंपरिक भातशेती व त्यानंतर पावटे, कडवे व तूर यांची शेती केली जाते. मात्र यावर्षी अवकाळी पावसाने दोन्ही पिकांचे ९० टक्के नुकसान केले आहे. तयार झालेल्या भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात कडधान्य पेरण्यासाठीदेखील हवामान अनुकूल नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार ऑक्टोबर महिन्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे ४५ गावांतील ५०८ शेतकऱ्यांचे सुमारे ९३.०४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करण्यात आले आहेत.

तालुक्यात मे ते सप्टेंबर २०२५ या पाच महिन्यांच्या कालावधीतही पिकांचे नुकसान झाले होते. त्यावेळी ४५ गावांतील २४५ शेतकऱ्यांचे ४ लाख ८८ हजार ७५५ रुपयांचे नुकसान झाले होते. एकूण ४७.७५ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीची नोंद झाली होती. त्यापैकी जून ते ऑगस्ट महिन्यातही नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली आहे. मात्र सप्टेंबरअखेरपासून सुरू झालेल्या अवेळी पावसामुळे नुकतेच कापणीला आलेले भातपिक पुन्हा बाधित झाले आहे. गेल्या आठवड्याभरात संध्याकाळच्या सरीने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून पिके आडवी झाली, तर काहीठिकाणी भाताचे रोप पूर्ण तुटून चिखलात गेली आहेत. कृषी विभागाकडून नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम अद्याप प्रगतिपथावर आहे. परिणामी यावर्षी भात उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कृषी विभागाकडून नुकसानीचा पंचनामा सुरू असून नवीन पंचनामे तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भातशेती नंतर कोकणात पावटा, कडवा, तूर आदींची शेती हिवाळ्यात केली जाते. मात्र काही दिवस हलक्या सरी बसरण्याची शक्यता शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे सावट निर्माण करत आहेत.

स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पावसामुळे भाताचे पीक चिखलात रुतले आहे. काही ठिकाणी कापणी केलेले भातपिकाला नवीन कोंब आलेले आहेत. या परिस्थितीत उत्पादनात ८० टक्केपर्यंत घट होऊ शकते दरम्यान अजूनही तालुक्यात पावसाच्या सरी सुरू आहेत. पुढील काही दिवस हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे कापलेले भातपीक वाळणे व कडधान्य पेरणे याबाबत शेतक-यांची चिंता वाढली आहे.

गेले पंधरा दिवस सुरू असलेल्या पावसामुळे कापलेल्या भातशेती चे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या संकटातून शेतकरी वर्ग सावरणे कठीण आहे. या परिस्थितीत शासनस्तरावरून मदत मिळणे आवश्यक आहे- प्रमोद हुमणे, शेतकरी, मुरडे

चार दिवसांत नुकसानीचा अहवाल पूर्ण होणार
परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. हवामान स्थिर झाल्यानंतर अचूक आकडे निश्चित करून शासनाकडे अहवाल पाठवला जाईल. येत्या चार दिवसांत नुकसानीचा अहवाल पूर्ण होईल, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी रवींद्र माळी यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 01/Nov/2025