देवरूख : शहरातील खराब झालेला मुख्य रस्ता व शहरात आवश्यक सीसीटीव्ही यासाठी आमदार शेखर निकम यांनी ९८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे ही महत्त्वाची विकासात्मक कामे मार्गी लागणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
देवरूख मशिद ते चोरप रस्ता हा गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत खराब अवस्थेत होता. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष हनिफ हरचिकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने २२ सप्टेंबर रोजी बैठक घेतली होती. यावेळी आमदारांनी दिवाळीपूर्वी या रस्त्यासाठी निधी मंजूर केला जाईल, असा ठाम शब्द दिला होता आणि तो शब्द पाळत त्यांनी ६५ लाखांचा निधी मंजूर करून आणला आहे.
याचबरोबर देवरूख शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रश्नसुद्धा आमदारांनी तातडीने सोडवला आहे. या उपक्रमासाठी ३३ लाखांचा निधी त्यांनी मंजूर करून आणला आहे.
या दोन्ही महत्त्वाच्या कामांसाठी निधी नागरी सेवा व सुविधा पुरविणे या योजनेतून प्राप्त करण्यात आला आहे. यामुळे देवरूख शहराचा विकास आणि नागरिकांची सुरक्षितता या दोन्ही बाबींना नवे बळ मिळणार आहे. याबाबत आमदार शेखर निकम यांनी, देवरूख, चिपळूण आणि संपूर्ण संगमेश्वर मतदारसंघातील उर्वरित प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावले जातील असेही अभिवचन दिले आहे.
यातून जनतेच्या प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून दिलेला शब्द प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे आमदार निकम असल्याचे सिद्ध झाल्याचे हनीफ हरचीरकर यांनी स्पष्ट केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 01/Nov/2025














