चिपळूण : विद्याभारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत संचलित शिरळ येथील विद्याभारती भारतीय शिक्षासंकुलातर्फे सुजाण पालक व सुदृढ बालक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ६ नोव्हेंबरला सकाळी १० ते १ दरम्यान शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माधवबाग सभागृहात होणार आहे. या वर्षीच्या बालदिनाचे औचित्य साधून या चिपळूण तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन केले आहे.
विद्याभारती संस्थेची शिरळ येथे गेली १० वर्षे गुरुकुल पद्धतीची शाळा सुरू आहे. मुलांचा शारीरिक, मानसिक संगीत, व बौद्धिक विकास हे संस्थेचे ध्येय आहे. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच चित्रकला, हस्तकला, मल्लखांब, अॅथलेटिक्स अशा सर्व कला व कौशल्य यांचे शिक्षण येथे दिले जाते. सध्या लहान मुलांना मोबाईलचे व्यसन जडत आहे.
जंकफूडच्या वाढत्या प्रमाणामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात येत आहे. याविषयी जनजागृती होण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. बालक व पालक अशा दोन गटांत स्पर्धा आहे. बालकांमध्ये २ गट असून, छोटा गट १ ते ४ वर्षे, मोठा गट ४ ते ८ वर्षे असा आहे. पालकांसाठी एकच गट आहे. यामध्ये पालक आपल्या बालकासह सहभागी होऊ शकतात किंवा स्वतंत्रपणेदेखील सहभाग घेऊ शकतात. प्रत्येक गटासाठी तीन फेऱ्या असतील. डॉक्टर, आहारतज्ज्ञ, सायकॉलॉजिस्ट, शिक्षणतज्ज्ञ व समाजातील मान्यवर असे परीक्षक असतील. यामध्ये मुलांच्या शारीरिक व बौद्धिक क्षमतांचे मूल्यमापन होईल. पालकांचे बौद्धिक, मानसिक व वैचारिक क्षमतांचे मूल्यमापन केले जाते. प्रत्येक गटातून ३ विजेत्यांना बक्षिसे, सहभाग आणि विजेते प्रमाणपत्रे मिळणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 01/Nov/2025














