राजापूर : सागरी किनारपट्टीवरील प्रतिकूल स्थिती आणि कमी मिळणाऱ्या मासळीमुळे मच्छीमारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामध्ये आता गेल्या आठवडाभरापासून घोंगावत असलेल्या मोथा वादळाची भर पडली आहे. या वादळातून निर्माण झालेल्या प्रतिकूल स्थितीमुळे साखरीनाटे बंदरामध्ये गेल्या आठ दिवसांपासून मच्छीमारांनी मासेमारी थांबवली आहे. त्यामुळे साखरीनाटे बंदरामध्ये नेहमी दिसणारी लगबग थांबली आहे. मासेमारी बंद असल्याने सुमारे १५ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाले असून, मासेमारीवर आधारित व्यावसायिकांचीही आर्थिक कोंडी झाली आहे.
तालुक्याच्या किनारपट्टीवर साखरीनाटे बंदर असून, दरदिवशी मच्छीमारीमधून लाखो रुपयांची उलाढाल होते. या ठिकाणी सुमारे ७०-७५ पर्सिनेट, १५० ते २०० फिशिंग ट्रॉलर, १०० यांत्रिक होड्या, सुमारे ५० बिगरयांत्रिकी होड्या, असे मिळून ३५०-३७५ मच्छीमार नौका मच्छीमारी करतात. त्यातून मच्छीमार व्यवसायातून वर्षाला सुमारे शंभर कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल या बंदरामध्ये होते. विविध वादळे, अतिवृष्टी, सोसाट्याचा वारा यामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल स्थितीला मच्छीमारांना सामारे जावे लागत असून, कमी प्रमाणात मिळणाऱ्या मासळीमुळे आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागत आहे. पावसानेही धुमाकूळ घातला असूनही ‘मर्मोथा’ वादळाचा परिणाम जाणवत आहे.
मुसळधार पावसाच्या जोडीला खवळलेला समुद्र, अजस्र लाटा आणि वारा यामुळे मासेमारीसाठी प्रतिकूल वातावरण आहे. मोंथा वादळाच्या परिणामामुळे हवामान खात्याने मच्छीमारांना समुद्रामध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आठ दिवसांपासून साखरीनाटे बंदरात्तील मासेमारी ठप्प आहे. पावसाचा जोरहीं कायम असल्याने मच्छीमारांना समुद्रात जाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. मच्छीमारीवर अवलंबून असलेला वाहतूक व्यवसाय, बर्फाच्या फॅक्टरी छोटे मासे विक्रेते यांचाही व्यवसाय ठप्प झाला असून, साऱ्यांचीच आर्थिक कोंडी झाली आहे.
मोथा वादळामुळे समुद्रामध्ये प्रतिकूल स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून मासेमारी आणि त्यावर अवलंबून असलेले छोटे-मोठे विविध व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले आहेत. प्रतिकूल स्थिती संपुष्टात येण्याची प्रतीक्षा आहे. ठप्प झालेल्या मासेमारीमुळे लाखो रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. अमजद बोरकर, मच्छीमार नेते
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 PM 01/Nov/2025














