गुहागर : कोकण किनारपट्टीवर अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळी स्थितीमुळे सात नौकांशी संपर्क तुटला होता. यामध्ये गुहागर तालुक्यातील दोन नौका आणि सुमारे ३०-४० खलाशी असल्यामुळे गुहागर तालुक्यासह करंजा, मढ, न्हावाशेवा, वर्सोवा बंदरांत गेले तीन दिवस चिंतेचे वातावरण होते. सकाळी त्या दोन बोटींसह चार बोटींशी संपर्क झाला. या बोटींवर काम करणारे खलाशी सुखरूप असल्याचे कळले आणि कोळीवाड्यातील चिंता दूर झाली.
२५ ऑक्टोबरदरम्यान वर्सोवा, मढ, न्हावाशेवा, करंजा या मोठ्या बंदरांसह कोकण किनारपट्टीवरील सुमारे २० ते ३० मच्छीमार नौका खोल समुद्रात मासेमारीला गेल्या होत्या. संबंधित नौकांना वादळाचा इशारा मिळाल्यावर सुरक्षित बंदरात जाण्यासाठी या नौका निघाल्या; मात्र सात बोटींना परतीच्या प्रवासात वादळाने घेरले. २६ ऑक्टोबरला या नौकांशी संपर्क तुटल्यानंतर बंदरविभाग, मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवरून कळविले.
चिंतेचे वातावरण
सागरी सीमामंचचे कार्यकर्ते, करंजा सोसायटीमधील पदाधिकारी यांनी तटरक्षक दल, नौदल, मत्स्य विभागाचे मंत्री नीतेश राणे, सहायक आयुक्त देवरे यांच्याशी संपर्क साधून पाठपुरावा सुरू केला. २९ तारखेला रात्री एका बोटीवर संपर्क साधण्यात तटरक्षक दलाला यश आले. संपर्क होत नसलेल्या बोटींवर गुहागर तालुक्यातील खलाशी होते. त्यामुळे साखरीआगर, धोपावे, वेलदूर, नवानगर येथील कोळीवाड्यातून चिंतेचे वातावरण होते. शुक्रवारी दुपारी ३ च्या दरम्यान दोन बोटी करंजा बंदरात पोहोचल्या. उर्वरित दोन बोटी करंजा बंदराकडे निघाल्याची माहिती मिळाली. शुक्रवारी सकाळी दोन बोटी कुलाबा बंदराच्या दिशेने निघाल्या. सर्व बोटींवरील खलाशी सुखरूप असल्याची माहिती मिळाल्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 PM 01/Nov/2025












