चिपळूण : स्मार्ट मीटर संदर्भातील ग्राहकांच्या तक्रारींची दखल एक महिना होऊनदेखील न घेतल्याने अखेर उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचे तालुका अधिकारी उमेश खताते यांच्या नेतृत्वाखाली खेर्डी येथील महावितरण कार्यालयातच बैठे धरणे आंदोलन करण्यात आले. उमेश खताते व त्यांच्या सहकाऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयात ठाण मांडून, जोपर्यंत न्याय मिळत नाही व लेखी उत्तर मिळत नाही तोपर्यंत कार्यालयातून बाहेर जाणार नसल्याचा इशारा देऊन बैठ्या आंदोलनावर ठाम राहिले. अखेर तीन तासांनी संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना लेखी उत्तर दिले.
सध्या वीज महामंडळाकडून ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवून देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे; मात्र स्मार्ट मीटरसंदर्भात ग्राहकांकडून व संबंधित तज्ज्ञांकडून तक्रारी सुरू झाल्या आहेत. यामध्ये तांत्रिक दोष तसेच वापरलेल्या विजेपेक्षा अधिक रक्कमेचे बिल येणे अशा स्वरूपाच्या तांत्रिक तक्रारी ग्राहकांनी केल्या असून वीज मंडळाने स्मार्ट मीटर बसवू नयेत व ग्राहकांना वेठीस धरू नये यासाठी महिनाभरापूर्वी उबाठा शिवसेना गटाच्या युवा सेनेच्यावतीने मोठे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते व आमदार भास्कर जाधव यांनी नेतृत्व करून खेर्डी वीज मंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या तक्रारींचे पंधरा दिवसांत योग्य निरसन केले जाईल, असे आश्वासन दिले; मात्र महिनाभरानंतरही खेर्डी परिसरातील ग्राहकांनी दिलेल्या तक्रारींचे निरसन न झाल्याने आज (दि. ३१) युवा सेना तालुका अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी खेर्डी येथील वीज मंडळाचे कार्यालय गाठून कार्यालयातच बैठे आंदोलन सुरू केले.
जोपर्यंत योग्य न्याय व लेखी उत्तर मिळत नाही तोपर्यंत कार्यालयातून हलणार नाही असा इशारा खताते यांनी दिला. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी, येत्या पंधरा दिवसांत सर्व तक्रारदार वीज ग्राहकांच्या तक्रारींचे योग्य पद्धतीने लेखी निरसन केले जाईल असे आश्वासन दिले. यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी विभागप्रमुख विजय शिर्के, युवासेना विभाग प्रमुख राहुल भोसले, ओंकार पंडित, सुधाकर दाते, पिंट्या यादव, संकेत खताते, दीपक पवार व काही ग्राहक उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:10 PM 01/Nov/2025












