Ratnagiri : अवकाळीमुळे कोकणातील भातशेती, बागायतदार संकटात!

दापोली : कोकणातील भातशेतीला अवकाळी पावसाचा जबर तडाखा बसला असून, शेतकऱ्यांचे वर्षभराचे श्रम अक्षरशः पाण्यात बुढाले आहेत. तयार भाताची रोपे पावसामुळे शेतातच कुजण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णतः कोलमडले आहे.

तिकडे पश्चिम महाराष्ट्रात नुकसानभरपाई आणि कर्जमाफीसाठी आंदोलने पेटली असताना, कोकणातील शेतकऱ्यांच्या व्यथेला कोणीही आवाज देताना दिसत नाही. स्वाभिमानी आणि शांत स्वभावाचा कोकणातील शेतकरी या वर्षी मात्र पुरता संकटात सापडला असून शासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष त्याच्या जखमांवर मीठ चोळणारे ठरत आहे.

कोकणातील भात हे येथील पारंपरिक आणि प्रमुख पीक आहे. या पिकावर हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. कोकण विभागात या वर्षी सुमारे २ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर भातशेती झाली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाणे हे जिल्हे या उत्पादनात अग्रस्थानी आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे या विस्तीर्ण क्षेत्रातील पिके पाण्यात बुडाली असून, अनेक ठिकाणी रोपे कुजत आहेत. कृषी तज्ज्ञांच्या मते, या परिस्थितीमुळे कोकणातील भात उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी औषधांचा वापर करून पिके वाचवण्याचा प्रयत्न केला; परंतु सततचा पाऊस आणि थंड हवामानामुळे तो निष्फळ ठरला.

शासनाने तत्काळ नुकसानीचा अहवाल पंचनामा करून शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी आता तरी या स्वाभिमानी शेतकऱ्यांसाठी ठोस पाऊले उचलावीत, अशी भावना कोकणभर व्यक्त होत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आणि कोकणामध्ये शेतकन्यांचे मुख्य पीक हे भातशेती. मात्र हीच भातशेती अवकाळी पावसाने कुजू लागली आहे. याबाबत शेतकऱ्यांच्या बाजूने कुणीही उभे राहिले नाही तर शेतक-यांना शेतीची नुकसान भरपाई मिळावी म्हणून मी तहसीलदार यांना अर्ज दिला आहे. – मंगेश महाडिक, सामाजिक कार्यकर्ते आंजर्ले

रत्नागिरी जिल्ह्यात १७६ हेक्टर भातशेतीचे नुक्सान आतापर्यंत झाले आहे. कृषी विभागातील कर्मचारी, अधिकारी नुकसानग्रस्त भागातील शेतीचे पंचनामे करत आहेत, तर बोडयाफार प्रमाणात भात शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे- शिवकुमार सदाफुले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी

जिल्हानिहाय भात लागवड क्षेत्र
रायगड जिल्हा : सुमारे १ लाख ६ हजार २६३ हेक्टर कोकणातील सर्वांत मोठा भात उत्पादक जिल्हा.
पालघर जिल्हा : सुमारे ७६ हजार हेक्टर क्षेत्रात भात लागवड.
रत्नागिरी जिल्हा : सुमारे ४० हजार हेक्टर क्षेत्रात भातशेती
सिंधुदुर्ग जिल्हा : ६० ते ६५ हजार हेक्टर क्षेत्र; उत्पादनक्षमता सर्वाधिक.
ठाणे जिल्हा सुमारे :५५ हजार हेक्टर क्षेत्रात भात लागवड.

गणेशोत्सवानंतर झालेल्या पावसामुळे आंब्याला आलेली पालवी कुजून त्याचा डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये येणार्‍या आंब्याच्या मोहोरावर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती आंबा बागायतदारांकडून वर्तविली जात आहे. अवेळी पावसाचे आणखीन काही दिवस सातत्य राहिल्यास यावर्षीचा आंबा हंगाम नेहमीपेक्षा पंधरा दिवस लांबणीवर पडण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. असे घडल्यास त्याचा यावर्षीच्या आंबा हंगामाला आणि बागायतदारांच्या उत्पन्नाला फटका बसण्याची शक्यता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:50 PM 01/Nov/2025