Chiplun : चिपळूण नगर परिषद आवारात कामे वाटपावरून दोन ठेकेदारांमध्ये वाद!

चिपळूण : कामांच्या वाटपावरून दोन ठेकेदारांमध्ये चिपळूण नगरपरिषदेच्या इमारतीतच वादावादी झाल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला. मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेरच हा प्रकार घडल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने संबंधीत ठेकेदारांची समजूत काढत त्यावर पडदा टाकण्यात आला.

सध्या नगरपरिषदेकडून जिल्हा नगरोत्थान अंतर्गत ७ कामांची निवीदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये शहरातील रावतळे, शंकरवाडी, पाग, मुरादपूर, या परिसरातील गटारे, संरक्षक भिंत, पाखाडी व इतर मोठ्या कामांचा समावेश आहे. याच पद्धतीने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रातील अधिसुचीत विशिष्ठ नागरी सेवा व सुविधा पुरवण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. यामध्ये लहान मोठ्या १७ कामांचा समावेश आहे. या कामांबाबत काही ठेकेदार एकत्रित येऊन त्याविषयीची चर्चा करत असतानाच अचानक दोन ठेकेदारांमध्ये वादावादीला सुरवात झाली. त्यानंतर जोरजोरात बाचाबाची व अंगावर धाऊन जात धक्काबुक्कीचा प्रकार देखील घडल्याने काही नागरिक व अधिकारी कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेतली. त्या दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न केला.

मात्र कोणीही ऐकण्यास तयार नव्हते. हा सर्व प्रकार मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या कक्षाबाहेरच सुरू होता. अखेर त्या दोघांना काही ठेकेदार व अधिकाऱ्यांनी बाजूला नेत त्यांची समजूत काढली. या प्रकाराची माहिती मिळताच अन्य ठेकेदार व काही लोकप्रतिनीधींनी नगरपरिषदेकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत वातावरण शांत झाले होते. मात्र नगरपरिषदेच्या वर्तुळात या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:16 PM 01/Nov/2025