राजापूर : मोकाट गुरांचा प्रश्न गंभीर होत असून, महामार्गावरच नव्हे तर राजापूरमध्ये ठिकठिकाणी अपघात होत आहेत. हे टाळण्यासाठी राजापूर पालिकेने शहरात फिरणाऱ्या मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम हाती घेतली. सहा गुरे पकडून त्यांची रवानगी कोंडवाड्यात केली गेली; मात्र त्यांना सोडवण्यासाठी गुरांचे मालकच फिरकले नसल्याने हा प्रश्न सोडवायचा कसा, ही चिंता पालिकेपुढे निर्माण झालेली आहे.
गेल्या काही वर्षांपासून राजापूर शहरवासियांना सतत मोकाट गुरांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वाहनांच्या वर्दळीत भररस्त्यांमध्ये ठाण मांडून बसलेल्या मोकाट गुरांमुळे अपघातही घडले आहेत. यामध्ये मोकाट गुरेही दगावली आहेत. त्यामुळे मोकाट गुरांची समस्या तत्काळ सोडवण्याची मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. महिनाभरापूर्वी त्याबाबत प्रशासनाला निवेदन देत काही लोकांनी आंदोलनही छेडले होते. त्यानंतर, प्रशासनाने मोकाट गुरांविरोधात आक्रमक पवित्रा घेत कारवाईचा बडगा उगारला. त्यात नगरपालिकेने शहरामध्ये फिरणाऱ्या दहा मोकाट गुरांना ताब्यात घेतले होते. त्यापैकी दंडात्मक रक्कम भरून चार गुरे मालकांनी सोडवून ताब्यात घेतली. त्यानंतर अद्यापही नगरपालिकेच्या कोंडवाड्यामध्ये ६ गुरे तशीच आहेत. ती सोडवण्यासाठी गुरांचे मालक महिना झाला तरीही फिरकलेले नाहीत. त्यामुळे सध्या कोंडवाड्यातील त्या गुरांच्या लिलावाची पालिकेने नोटीस प्रसिद्ध केली. त्यालाही प्रतिसाद मिळालेला नाही. गेले महिनाभर ही गुरे पालिकेच्या कोंडवाड्यातच आहेत.
नगरपालिकेने कारवाई करून मोकाट गुरे पकडली आहेत. सध्या सहा गुरे पालिकेच्या कोंडवाड्यात आहेत. ती गुरे ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या मालकांनी अद्यापही पालिकेशी संपर्क साधलेला नाही. त्याचवेळी पालिकेने घोषित केलेल्या लिलावालाही प्रतिसाद मिळालेला नाही – जितेंद्र जाधव, नगरपालिका, राजापूर
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:27 PM 01/Nov/2025












