भारताच्या विश्वविजयाचा ‘रत्नागिरी’ पॅटर्न! अविष्कार साळवींच्या मार्गदर्शनाने महिला संघ चॅम्पियन, मालगुंडमध्ये जल्लोष

रत्नागिरी : भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी इतिहास रचला. महिला विश्वचषक स्पर्धेच्या (Women’s World Cup) अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताने आपले पहिले-वहिले विश्वविजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजयाने संपूर्ण देशात आनंदाची लाट उसळली असतानाच, रत्नागिरी जिल्ह्यासाठी आणि विशेषतः मालगुंड गावासाठी हा आनंद द्विगुणित झाला आहे. याचे कारण म्हणजे, या विजयाचे एक प्रमुख शिल्पकार ठरलेले भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक अविष्कार साळवी (Avishkar Salvi) हे मालगुंडचे सुपुत्र आहेत.

रत्नागिरीच्या सुपुत्राची ‘विजयी’ रणनीती

भारतीय महिला संघाने यापूर्वी दोन वेळा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती, मात्र दोन्ही वेळा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. पण यावेळची कहाणी वेगळी होती. प्रशिक्षक अविष्कार साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय गोलंदाजांनी संपूर्ण स्पर्धेत आणि विशेषतः अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी केली. साळवी यांनी गोलंदाजांसाठी आखलेली रणनीती आणि दिलेले धडे संघाच्या विजयात निर्णायक ठरले.

मालगुंडशी जोडली आहे नाळ

Naadi pariksha

अविष्कार साळवी यांचा जन्म जरी मुंबईत झाला असला, तरी त्यांची नाळ कोकणातील मातीशी घट्ट जोडलेली आहे. त्यांचे मूळ गाव रत्नागिरी तालुक्यातील कवी केशवसुतांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेले मालगुंड (Malgund, Ratnagiri) हे आहे. गावातील मराठवाडी येथे त्यांचे वडिलोपार्जित घर आहे. अविष्कार यांचे आपल्या आई-वडिलांसोबत गावी नियमित येणे-जाणे असते, त्यामुळे त्यांचे आणि गावाचे नाते अतूट राहिले आहे.

माजी वेगवान गोलंदाज ते ‘विश्वविजेता’ प्रशिक्षक

अविष्कार साळवी यांची स्वतःची क्रिकेट कारकीर्दही प्रभावी राहिली आहे. उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. मुंबईसाठी रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) त्यांनी आपल्या प्रतिभेचे शानदार प्रदर्शन केले. त्यांच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसाठी आणि चेंडू स्विंग करण्याच्या क्षमतेसाठी ते ओळखले जायचे. याच कौशल्याच्या जोरावर त्यांनी काही आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व (Played for India) देखील केले, ज्यामुळे त्यांना जागतिक स्तरावरील मौल्यवान अनुभव मिळाला.

हाच अनुभव त्यांनी भारतीय महिला संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळताना पणाला लावला आणि संघाला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.

मालगुंड गावात दुहेरी आनंद

अविष्कार साळवी यांनी यापूर्वी क्रिकेटमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मालगुंड गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार देखील केला होता. आपल्या गावचा सुपुत्र भारतीय संघाचा भाग आहे, याचा अभिमान मालगुंडवासीयांना नेहमीच वाटत आला आहे. आता, अविष्कार यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने विश्वचषक जिंकल्याने मालगुंड गावात दुहेरी आनंद साजरा केला जात आहे. भारताचा विजय आणि त्यात आपल्या ‘माणसा’चा मोलाचा वाटा, यामुळे संपूर्ण कोकणात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे.