रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा सुतारवाडी (Hatkhamba Sutarwadi) येथे एका घरात मोठी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. संपूर्ण कुटुंब घरात गाढ झोपेत असतानाच, अज्ञात चोरट्याने खिडकीतून प्रवेश करून घरातील कपाट तोडले आणि तब्बल ५ लाख ७६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने (Gold Jewelry) लंपास केले. ही धक्कादायक घटना दि. १ नोव्हेंबरच्या रात्री ते २ नोव्हेंबरच्या पहाटेदरम्यान घडली.
याप्रकरणी मृणाल महेश पांचाळ (वय ४८ वर्षे, व्यवसाय गृहिणी, रा. घर नं १९६ ब, हातखंबा सुतारवाडी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात (Ratnagiri Rural Police) फिर्याद दिली आहे.
अशी घडली चोरी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांचाळ कुटुंबिय दि. ०१ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास झोपी गेले. दि. ०२ नोव्हेंबर रोजी सकाळी ०६:०० वाजता त्यांना जाग आली, तेव्हा घरातील चोरीचा प्रकार उघडकीस आला.
अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळी घराच्या एका खोलीची स्लाईडिंग खिडकी कोणत्यातरी हत्याराच्या साहाय्याने उघडली आणि आत प्रवेश केला. त्यानंतर, फिर्यादी यांनी लॉक केलेल्या लोखंडी कपाटाचा दरवाजा तोडून चोरट्याने कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले मौल्यवान दागिने चोरून नेले.
चोरीला गेलेला एकूण मुद्देमाल (एकूण ५,७६,०००/- रुपये)
या घरफोडीत एकूण ९ तोळे ६ ग्रॅम वजनाचे सोने चोरीला गेले आहे, ज्याची किंमत खालीलप्रमाणे:
१) ४३ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र – किंमत रु. २,५८,०००/- २) १२ ग्रॅम वजनाचा गळ्यातील हार – किंमत रु. ७२,०००/- ३) ०६ ग्रॅम वजनाची अंगठी – किंमत रु. ३६,०००/- ४) ०९ ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स – किंमत रु. ५४,०००/- ५) ०८ ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स – किंमत रु. ४८,ooo/- ६) ०५ ग्रॅम वजनाची कानातील चेन (वेल) – किंमत रु. ३०,०००/- ७) ०९ ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स (३ जोड) – किंमत रु. ५४,०००/- ८) ०१ ग्रॅम वजनाचे नाकातील ४ फुले – किंमत रु. ६,०००/- ९) ०१ ग्रॅम वजनाचे गणपतीचे पान – किंमत रु. ६,०००/- १०) ०१ ग्रॅम वजनाचे सटवाई (टाक) – किंमत रु. ६,०००/- ११) ०१ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ – किंमत रु. ६,०००/-
पोलिसात गुन्हा दाखल, तपास सुरू
मृणाल पांचाळ यांनी दि. ०२ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजून १ मिनिटांनी पोलिसात रीतसर तक्रार दाखल केली. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, गु.र.नं. १९८/२०२५ अन्वये, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३३१(४) (घरफोडी) आणि ३०५ (अ) (चोरी) प्रमाणे अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भर वस्तीत झालेल्या या धाडसी चोरीमुळे हातखंबा परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 03-11-2025












