रत्नागिरी/खेड : खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी (Lote MIDC) परिसरातील रासायनिक कंपन्यांकडून होणाऱ्या जलप्रदूषणाचा (Water Pollution) मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कोतवली गावची जीवनवाहिनी असलेल्या सोनपात्र नदीच्या (Sonpatra River) पात्रात थेट केमिकल मिश्रीत दूषित सांडपाणी सोडल्याप्रकरणी, खुद्द कोतवलीच्या सरपंचांनीच आक्रमक भूमिका घेतली आहे.
याप्रकरणी निर्मळ ग्रामपंचायत कोतवलीच्या सरपंच अक्षता महेश तांबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, खेड पोलिसांनी (Khed Police) लोटे एमआयडीसीमधील ३ नामांकित कंपन्यांसह इतर कंपन्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
सरपंच अक्षता तांबे (वय ३३ वर्षे) यांनी दिनांक ०२ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री उशिरा (२३.४२ वा.) खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, जुन २०२५ ते ०२ नोव्हेंबर २०२५ या मुदतीमध्ये कोतवली गावाच्या सोनपात्र नदी पात्रामध्ये रासायनिक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात दूषित पाणी सोडले.
या कंपन्यांच्या या कृत्यामुळे सार्वजनिक नदीचे पाणी घाण झाले असून, ते पिण्यायोग्य राहिलेले नाही.
या कंपन्यांवर झाला गुन्हा दाखल
सरपंचांनी दिलेल्या तक्रारीत लोटे एमआयडीसीमधील तीन कंपन्यांची नावे स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहेत. १) योजना ऑर्गेनिक कंपनी (Yojana Organic Company) २) पुष्कर केमिकल कंपनी (Pushkar Chemical Company) ३) श्रेष्टा ऑर्गेनिक कंपनी (Shreshtha Organic Company) ४) एम.आय.डी.सी मधील अन्य कंपन्या
आरोग्यासह शेती आणि मच्छिमारीला फटका
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, या कंपन्यांनी सोडलेल्या केमीकलयुक्त सांडपाण्यामुळे नदीचे पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे. हे पाणी वापरल्याने कोतवली गावातील ग्रामस्थांना व जनावरांना मोठा त्रास होत असून, नागरिक आजारी पडत आहेत.
तसेच, नदीतील जलचरांवर परिणाम झाल्याने मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले आहे. या दूषित पाण्याचा फटका शेतीलाही बसला असून, नदीच्या पाण्याची योग्यता कमी होऊन ते घाण झाले आहे, असे सरपंचांनी म्हटले आहे.
पोलिसांची कारवाई
सरपंच अक्षता तांबे यांच्या तक्रारीवरून खेड पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. पोलिसांनी गु.र.नं. ३३३/२०२५ अन्वये, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २७९ (सार्वजनिक झऱ्याचे पाणी दूषित करणे) आणि कलम ३(५) अन्वये संबंधित कंपन्यांवर गुन्हा दाखल केला आहे. लोटे एमआयडीसीतील प्रदूषणाच्या विरोधात थेट सरपंचांनीच तक्रार दिल्याने या प्रकरणाला गंभीर स्वरूप प्राप्त झाले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 03-11-2025












