Lanja : कोत्रेवाडी घनकचरा प्रश्न; खासदार नारायण राणे यांच्याकडून दखल

लांजा : घनकचरा प्रकल्पासंदर्भात कोत्रेवाडी ग्रामस्थांचे गेली ८० दिवस उपोषण सुरू असून त्यांची तातडीने भेट घेऊन नागरिकांचे म्हणणे रेकॉर्ड करा आणि मला तातडीने सविस्तर माहिती पाठवा असे आदेश, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

कोत्रेवाडी घनकचरा (डम्पिंग ग्राउंड) प्रकल्पासंदर्भात गेल्या ८० दिवसापासून उपोषणाला बसलेल्या कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या प्रश्नासंदर्भात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय यादव यांनी रत्नागिरी येथे पार पडलेल्या खासदार नारायण राणे यांच्या जनता दरबारात लक्षवेधी प्रश्न मांडला. त्यानंतर खासदार नारायण राणे यांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत तातडीने ग्रामस्थांची भेट घेऊन माहिती सादर करा असे आदेश दिले आहेत. लांजा नगरपंचायतीच्यावतीने कोत्रेवाडी येथे डम्पिंग ग्राउंड प्रकल्प प्रस्तावित आहे. लोकांच्या विरोध असून हा प्रकल्प रद्द करावा किंवा अन्य ठिकाणी स्थलांतरित करावा या मागणीसाठी कोत्रेवाडी ग्रामस्थ १४ ऑगस्टपासून लाक्षणिक उपोषणाला बसलेले आहेत. गेले ८० दिवस झाले तरीदेखील प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर रत्नागिरी येथे पार पडलेल्या खासदार नारायण राणे यांच्या जनता दरबारात भाजपाचे लांजा येथील माजी नगरसेवक आणि जिल्हा उपाध्यक्ष असलेले संजय यादव यांनी विशेष लक्षवेधी प्रश्न मांडला होता. ही बाब लक्षात घेऊन खासदार नारायण राणे यांनी देखील जिल्हा प्रशासनाला तत्काळ माहिती घेऊन नागरिकांची म्हणणे तत्काळ रेकॉर्ड करून मला त्यासंबंधी माहिती द्यावी, असे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:12 PM 03/Nov/2025