Sub District Hospital Dapoli : दापोली उपजिल्हा रुग्णालयाची नवीन इमारत निधीअभावी रखडली

दापोली : दापोली उपजिल्हा रुग्णालयासाठी अत्याधुनिक सुविधांनी सज्ज तीन मजली इमारतीचे स्वप्न आजही अपूर्णच आहे. तब्बल दोन वर्षे होत आली तरी, निधीअभावी केवळ पायाभरणीवरच काम थांबले आहे. त्यामुळे रुग्णसेवेचे दाखवलेले स्वप्न प्रत्यक्षात कधी उतरणार, असा सवाल दापोलीकर करत आहेत.

ही इमारत १०० खाटांच्या क्षमतेची असून, रुग्णांना आधुनिक उपचार सुविधा एका छताखाली मिळाव्यात, या उद्देशाने बांधकाम सुरू झाले आहे. मधूकमल कन्स्ट्रक्शन, विठा या कंपनीकडे कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. उपजिल्हा रुगणालय इमारतीच्या या कामाची निविदा १३ कोटी ३२ लाखांची असून, एकूण २० कोटी २१ लाख रुपये (जीएसटीसह) अशी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

कामाची सुरुवात २८ मार्च २०२३ रोजी झाली; मात्र आज दोन वर्ष होत आली तरी अजूनही पाया भरणीपलीकडे प्रगती नाही. आतापर्यंत ४१ लाख रुपये निधी खर्च झाल्याचे कनिष्ठ अभियंता यांनी सांगितले. निधीअभावी आणि कामाच्या ड्रॉईंगमध्ये झालेल्या विलंबामुळे बांधकाम रखडल्याचे कारण पुढे येत आहे. यापूर्वी या बांधकामाच्या परीक्षणाचा कार्यभार निनाद दामले यांच्याकडे होता, तर १८ जुलै २०२५ पासून कनिष्ठ अभियंता नवनाथ संजीव हराळे यांनी या कामाची जबाबदारी स्वीकारली आहे.

दरम्यान, या महत्त्वाच्या आरोग्य प्रकल्पाच्या संथ गतीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, “रुग्णालयाचे स्वप्न कधी साकार होणार?” असा सवाल सर्वत्र उपस्थित केला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 AM 04/Nov/2025